यात्रेसाठी महादेवगड मंदिर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 01:28 AM2019-03-03T01:28:05+5:302019-03-03T01:28:31+5:30
महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या दृष्टीने जिल्हाभरातील शिव मंदिरासह अन्य मंदिरे सज्ज झाली आहेत. अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार असल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/वैरागड : महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या दृष्टीने जिल्हाभरातील शिव मंदिरासह अन्य मंदिरे सज्ज झाली आहेत. अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार असल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पळसगाव-अरततोंडी येथील महादेवगडावर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
महादेवगडावर दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी उसळते. त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकाने लावण्याकरिता मंदिर ट्रस्टच्या वतीने तात्पुरते लाकडी शेड उभारण्यात आले आहेत. यात्रेला हजारो भाविकांची गर्दी उसळत असते. त्यामुळे सकाळपासूनच रात्रीपर्यंत भाविकांच्या लांब रांगा असतात. यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. पळसगाव परिसरातील जंगलातील पहाडावर हे मंदिर असल्याने वर्षभर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असते. अनेक भाविक संपूर्ण कुटुंबासह दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे भाविकांना आपले वाहन उभे करण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. ४ मार्चपासून येथे यात्रेला सुरूवात होणार असून ११ मार्चला समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान ५ मार्चपासून भागवत सप्ताह होईल. या सप्ताहात प्रवचनकार सुरेखा तिखे प्रबोधन करतील.
भंडारेश्वर देवस्थानात आज होणार घटस्थापना
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील भंडारेश्वर देवस्थानात ३ ते ५ मार्चपर्यंत महाशिवरात्री यात्रा भरविली जाणार आहे. श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती तथा ग्रामपंचायत वैरागड यांच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रविवार ३ मार्चला सायंकाळी घटस्थापना होईल. रात्री ९ वाजता भजन, ४ मार्चला सकाळी ६ वाजता महापूजा व अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता हवन, दुपारी २ वाजता उपवासाचा नाश्ता वितरित होईल. रात्री ९ वाजता प्रहार पूजा, भजन व जागरण होईल. मंगळवार ५ मार्चला सकाळी ६ वाजता पूजापाठ, सकाळी ११.३० वाजता प्रबोधन, दुपारी १ वाजता गोपालकाला, दुपारी ३ वाजता महाप्रसाद वितरण, सायंकाळी ६.१५ वाजता ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते टिपूर जाळला जाईल. रात्री १० वाजता महिला संच नाट्यप्रयोग सादर करतील.