महाराजस्व अभियानाला कर्मचाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:48 PM2018-07-02T22:48:38+5:302018-07-02T22:49:18+5:30
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनी येथे राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संबंधितांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करावी, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनी येथे राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संबंधितांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करावी, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाला काही मोजके तलाठी, कोतवाल व मंडळ अधिकारी उपस्थित होते. मात्र ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व इतर विभागाच्याही अधिकारी उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती बघून आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केले. कारण नसताना कार्यक्रमाला अनुपस्थित असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई करावी. तसेच त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. महाराजस्व अभियानाला तालुकाभरातून शेकडो शेतकरी उपस्थित होते. मात्र कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह नगराध्यक्ष योगीता पिपरे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक केशव निंबोड, तहसीलदार दयाराम भोयर, संवर्ग विकास अधिकारी विजय पचारे, सहायक संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.
रॉयल्टीसाठी वसा उपसरपंचांची विनवणी
वसा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या पांदन रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने ७०० ब्रासची रॉयल्टी २०१६ मध्ये काढली होती. त्याचे पैसे सुध्दा महसूल विभागाकडे भरले. ३०० ब्रासची रॉयल्टी देण्यात आली. उर्वरित रॉयल्टी मात्र देण्यात आली नाही. पांदन रस्त्यावर मुरूम टाकणे आवश्यक असल्याने महसूल विभागाने रॉयल्टी द्यावी, यासाठी वसाचे उपसरपंच शंकर इंगळे यांनी मंडळ अधिकारी सोनकुसरे यांना विनवणी केली. एवढेच नव्हे तर इंगळे हे सोनकुसरे यांच्या पायाही पडले. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी व उपसभापती विलास दशमुखे यांनी संबंधित ग्रामपंचायतीला लवकर रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले.