Maharashtra Election 2019 ; गडचिरोली-आरमोरीचा गड राखण्यात भाजपला यश, अहेरीत राष्ट्रवादीची मुसंडी, पराभवाचा वचपा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:28+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अहेरी मतदार संघातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी निवडताना गेल्या १० पदापासूनचा त्यांचा विजनवास दूर केला. त्यामुळे अहेरीत या विजयानंतर चांगलाच जल्लोष करण्यात आला. धर्मरावबाबा यांना आलापल्ली क्षेत्रातून अनपेक्षितपणे चांगली आघाडी मिळाली आहे.

Maharashtra Election 2019 ; BJP's success in maintaining Gadchiroli-Armoori stronghold; | Maharashtra Election 2019 ; गडचिरोली-आरमोरीचा गड राखण्यात भाजपला यश, अहेरीत राष्ट्रवादीची मुसंडी, पराभवाचा वचपा काढला

Maharashtra Election 2019 ; गडचिरोली-आरमोरीचा गड राखण्यात भाजपला यश, अहेरीत राष्ट्रवादीची मुसंडी, पराभवाचा वचपा काढला

Next

डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबेंचा दणदणीत विजय
अटीतटीच्या तिहेरी लढतीत अम्ब्रिशराव आत्राम यांचा पराभव
१० वर्षानंतर धर्मरावबाबांच्या हाती पुन्हा अहेरीची सूत्रे
मंत्रीपद मिळेल का? जिल्हावासीयांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील निकाल भाजपच्या बाजुने लागून विद्यमान आमदार अनुक्रमे डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांना मतदारांनी कौल दिला. मात्र अहेरीत माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव यांचा पराभव जिव्हारी लागला. या अनपेक्षित पराभवामुळे राजेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अहेरी मतदार संघातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी निवडताना गेल्या १० पदापासूनचा त्यांचा विजनवास दूर केला. त्यामुळे अहेरीत या विजयानंतर चांगलाच जल्लोष करण्यात आला.
धर्मरावबाबा यांना आलापल्ली क्षेत्रातून अनपेक्षितपणे चांगली आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विजयी रॅलीची सुरूवात आलापल्लीतून काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशस्तरीय युवा नेते ऋतुराज हलगेकर, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रशांत कुत्तरमारे, बबलू हकीम, शाहीन हकीम आदींसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
अहेरीतील तिहेरी मुकाबल्यात सर्वाधिक ६० हजार १३ मते धर्मरावबाबा यांना, अम्ब्रिशराव आत्राम यांना ४४ हजार ५५५ तसेच दीपक आत्राम यांना ४३ हजार २२ मते मिळाली. गडचिरोलीत डॉ.देवराव होळी यांना ९७ हजार ९१३, डॉ.चंदा कोडवते यांना ६२ हजार ५७२ तर वंचित बहुजन आघाडीचे गोपाल मगरे यांना ६७३५ मते मिळाली. आरमोरीत कृष्णा गजबे यांनाा ७५ हजार ७७, आनंदराव गेडाम यांना ५३ हजार ४१० तर सुरेंद्रसिंह चंदेल यांना २५ हजार २७ मते मिळाली.

ईव्हीएमने वाढविले टेन्शन
मतमोजणीदरम्यान गडचिरोली विधानसभा मतदार संघातील मतमोजणीचे निकाल बाहेर येण्यास वेळ लागत होता. त्यामुळे बाहेर निकालासाठी ताटकळत असलेल्या नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढत होते.
एका इव्हीएममध्ये थोडा तांत्रिक बिघाड येऊन ईव्हीएम काम करत नसल्यामुळे पुढील फेरीचे निकाल थांबून गेले होते. तो तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतरच आणि त्यातील मतांची नोंद घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे निकालाच्या प्रक्रियेत थोडी अडचण आली होती.

अन् अहेरीत बाजी पलटली
अटितटीच्या अहेरी मतदार संघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वाधिक होती. त्यानुसार पहिल्या ६ ते ७ फेऱ्यांमध्ये अम्ब्रिशराव आत्राम आणि दीपक आत्राम यांना आघाडी मिळत होती. पण आठव्या फेरीपासून बाजी पलटली.
आठव्या फेरीनंतर धर्मरावबाबा यांनी आघाडी घेतली. सुरूवातीला अतिशय कमी फरक असला तरी फेरीगणिक हा फरक वाढत गेला. त्यामुळे अहेरीत अम्ब्रिशराव यांच्या महलवर निराशा तर धर्मरावबाबांच्या वाड्यावर जल्लोषाला सुरूवात झाली.

उमेदवारांना शेवटपर्यंत आशा
साधारण पहिल्या फेरीपासून सर्व प्रमुख उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पराभवाच्या छायेतील उमेदवार काढता पाय घेतील अशी शक्यता होती. परंतू त्यांची आशा शेवटपर्यंत कायम होती.
उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर निकालाच्या उद्घोषणेकडे कान लावून दिवसभर प्रतीक्षा करत होते. गडचिरोलीत मुख्य रस्त्यावर बसण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे संध्याकाळपर्यंत आयटीआयसमोरील रस्ता माणसांनी गजबजून गेला होता.

या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
या निकालाने जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आणि प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी किशन नागदेवे यांच्याकडे सोपविली. पण ती त्यांनी समर्थपणे पेलून दाखविली.
काँग्रेस पक्षाने तीनही जागी उमेदवार उभे केले होते. पण एकाही जागी यश आले नाही. काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आनंदराव गेडाम दोन वेळा आमदार राहिले आहे. अपक्ष उमेदवाराच्या कथित अपहरणाने त्यांना शेवटच्या दिवसात प्रचारापासून दूर राहावे लागले. त्याचाही फटका त्यांना बसला.

Web Title: Maharashtra Election 2019 ; BJP's success in maintaining Gadchiroli-Armoori stronghold;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.