Maharashtra Election 2019 ; अहेरीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत नव्या पेचमुळे गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:28+5:30
विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यात भाजपच्या तिकीटसाठी चढाओढ निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील वातावरण ढवळून निघाले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव यांना भाजपने तिकीट दिल्याचे जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही चर्चेत असलेल्या अहेरी मतदार संघात बुधवारच्या रात्रीपासून तर गुरूवारच्या (दि.३) दुपारपर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे चांगलीच उलथापालथ झाली. या मतदार संघात आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपआपले अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने येथे आघाडीत बिघाडी होऊन दोन्ही उमेदवार एकमेकांविरूद्ध लढणार का? की काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी याबाबचा अंतिम निर्णय होणार आहे.
विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यात भाजपच्या तिकीटसाठी चढाओढ निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील वातावरण ढवळून निघाले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव यांना भाजपने तिकीट दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता धर्मरावबाबा राष्टÑवादीच्या तिकीटवरच लढणार असा अंदाज बांधल्या जात असताना तासाभरातच काँग्रेसने या मतदार संघासाठी दीपक आत्राम यांना तिकीट दिल्याचे जाहीर केले.
हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या कोट्यात असताना काँग्रेसने उमेदवार ठरवलाच कसा? या कारणावरून राष्ट्रवादीच्या गोटात रात्रभर चांगलीच खळबळ उडालेली होती. दरम्यान गुरूवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसने धर्मरावबाबा यांना अधिकृतपणे उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला, मात्र तिकडे काँग्रेसने तिकीट दिलेल्या दीपक आत्राम गटाचा जीव टांगणीला लागला. त्यांनी गुरूवारी काँग्रेसच्या वतीने नामांकन दाखल करण्यासाठी शक्तीप्रदर्शनाची तयारी केली होती. पण राष्ट्रवादीकडून धर्मरावबाबांचे तिकीट जाहीर झाल्याचे कळताच अहेरीला जात असलेला काँग्रेसचा ‘ए बी’ फॉर्म अर्ध्यातूनच परत आला. परिणामी दीपक आत्राम यांना त्या फॉर्मविनाच नामांकन दाखल करावे लागले. आत्राम यांनी आपल्या नामांकनात पक्ष म्हणून ‘काँग्रेस’ नमूद केले असले तरी त्यांना ए-बी फॉर्म मिळालाच नव्हता. काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असेल तर शुक्रवारी त्यांना ए-बी फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.
जर काँग्रेसने त्यांना ए-बी फॉर्म दिला तर या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होईल. त्यामुळे तीन ‘आत्रामां’सह वंचित बहुजन आघाडीचे (ग्रामसभेचे) उमेदवार सैनू गोटा हेसुद्धा चौरंगी लढतीचा भाग होतील.
- तर आत्राम यांना लढावे लागणार अपक्ष
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपल्या उमेदवाराला ए-बी फॉर्म दिला नाही तर दीपक आत्राम यांना अपक्ष निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही. १ आॅक्टोबरला त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसचे तिकीट मिळाल्यानंतर दि.३ रोजी वाजतगाजत शक्तीप्रदर्शन करत पुन्हा नामांकन दाखल करण्याचे ठरवले होते. मात्र रात्रीतून घडलेल्या घडामोडींमुळे त्यांचा हिरमोड झाला. असे असले तरी काँग्रेसच्या तिकीटबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी सकाळपर्यंत बाहेर येईल.
विशेष म्हणजे आत्राम हे आतापर्यंत आदिवासी विद्यार्थी संघ या त्यांच्या संघटनेच्या बॅनरखालीच काम करत होते. बुधवारच्या मध्यरात्री काँग्रेसच्या वतीने त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सिरोंचा भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघड विरोध दर्शवला. व्हॉट्स अॅप संदेशांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना काही ग्रुपवर व्यक्त होत होत्या. अनेक वर्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार की नाही? असे प्रश्नही विचारले जात होते.
‘लोकमत’चा अंदाज निघाला खरा
भाजपचे तिकीट धर्मरावबाबांनाच मिळणार असा दृढ विश्वास त्यांच्या गोटातील खास कार्यकर्त्यांना होता. मात्र भाजप त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवत त्यांचा ‘गेम’ करू शकते याचा अंदाज लोकमतने आधीच मांडला होता. त्यानुसार अगदी शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट नाकारत अम्ब्रिशराव यांचे नाव पक्के करण्यात आले. त्यामुळे धर्मरावबाबांच्या कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का ठरला. त्या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सावरले असले त्यांना आधीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
अहेरी मतदार संघातील काँग्रेसचे तिकीट दीपक आत्राम यांना जाहीर झाले होते. पण धर्मरावबाबांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्यामुळे त्यांचा ए-बी फॉर्म राखून ठेवण्यात आला. याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) तो निर्णय जाहीर केला जाईल.
- डॉ.नामदेव उसेंडी,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस