Maharashtra Election 2019 ; मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:28+5:30

येत्या १९ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर प्रचार थांबेल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी रॅली काढून शहरी मतदारांना साद घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अद्याप प्रचारापासून दूर असलेल्या गावांमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या हातात केवळ ३ दिवस आहेत.

Maharashtra Election 2019 ; Countdown to voting started | Maharashtra Election 2019 ; मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू

Maharashtra Election 2019 ; मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू

Next
ठळक मुद्देमोठ्या नेत्यांच्या सभाच नाही : आता केवळ चार दिवसांचा खेळ बाकी; उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग वाढत आहे. प्रचारासाठी केवळ चार दिवस हाती असल्यामुळे या दिवसात शिल्लक राहिलेला परिसर पिंजून काढण्यावर जोर दिला जात आहे. परंतू जिल्ह्यात काही नेत्यांचा अपवाद वगळता यावेळी कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या नसल्यामुळे निवडणुकीची रंगत पाहीजे तशी वाढलीच नाही. पुढील चार दिवसातही स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका राहण्याची शक्यता कमीच असल्यामुळे उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या भरोशावरच गड लढवावा लागत आहे.
येत्या १९ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर प्रचार थांबेल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी रॅली काढून शहरी मतदारांना साद घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अद्याप प्रचारापासून दूर असलेल्या गावांमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या हातात केवळ ३ दिवस आहेत. अजून बऱ्याच गावांमध्ये पोहोचणे बाकी असल्यामुळे उमेदवारांची दमछाक सुरू आहे. सकाळी ८ वाजतापासून बाहेर पडणारे उमेदवार रात्री उशिरा घरी पोहोचत आहेत.
गडचिरोली मतदार संघाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस, भाजपा या प्रमुख पक्षांसह शेकाप, संभाजी ब्रिगेड, गोंडवाना गणतंत्र पार्टी या पक्षांनीही चामोर्शी तालुक्यात प्रचाराची रंगत वाढविली आहे. भोंगे व मोठे बॅनर लावलेली वाहने सर्वदूर फिरत आहे. कर्णकर्कश आवाजात सिनेगीतांच्या चालींवर आधारित गाणी लावून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात राजकीय पक्ष यशस्वी होत आहेत. मात्र चामोर्शी तालुक्यात व शहरात कोणत्याही राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सभा अद्याप झालेली नाही. खेड्यापाड्यात पदयात्रा व कार्यकर्त्यांच्या कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत.
चामोर्शी शहरात कोणत्याही पक्षाची मोठी सभा न झाल्याने कार्यकर्ते व मतदारांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जोश निर्माण होऊ शकला नाही.
काँग्रेसच्या महिला उमेदवार नवख्या असल्याने त्यांची मतदारांना अजून तोंडओळखही नाही. त्यामुळे पक्षाच्या मोठ्या नेत्याची सभा कधी होणार, असा काळजीचा सूर कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

नेतेही नाही अन् अभिनेतेही नाही
पूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सिने अभिनेते, अभिनेत्री यांना हमखास आणले जात होते. त्यांचे रोड शो किंवा प्रचारसभा होत असे. त्यामुळे वातावरण निर्मितीसोबत कार्यकर्त्यांनाही जोश चढत होता. पण यावेळी कोणत्याही सिनेकलावंताला कोणत्याही पक्षाने जिल्ह्यात आणले नाही. पुढील तीन-चार दिवसात तरी एखाद्या मोठ्या नेत्याचे किंवा सिने अभिनेत्याचे दर्शन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गडचिरोली, आरमोरी, देसाईगंजातही सभा नाही
निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात असताना प्रमुख पक्षांचे स्टार प्रचारक जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी धावून आलेले नाहीत. आतापर्यंत भाजपचे नेते ना.सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या मोजक्या सभा सोडल्यास कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी या जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये एकही प्रचारसभा झाली नसल्यामुळे मतदारांना मोठे कोडे पडले आहे. पुढील तीन दिवसात सभा होईल की नाही, याची शाश्वती नसल्याचे प्रचार कार्यालयांमधून सांगण्यात आले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Countdown to voting started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.