Maharashtra Election 2019 ; उमेदवारांकडून शेवटचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:30+5:30
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याला सुरूवात झाली असून शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. उमेदवारांकडे आता दोनच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा जोर व वेग वाढविण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ८ ऑक्टोबरपासून उमेदवारांना प्रचार करता येणार होता. मात्र या दिवशी दसरा असल्याने अनेक उमेदवारांनी ९ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसात दुर्गम व ग्रामीण भागात प्रचार करण्यावर विशेष भर देण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.
गडचिरोली शहरात जवळपास ३० हजार मतदार आहेत. त्यामुळे निकालाच्या दृष्टीने गडचिरोली शहराचा कल कोणत्या बाजूने राहतो, हे ही महत्त्वाचे ठरणार आहे. तरीही आजपर्यंत गडचिरोली शहरात पाहिजे तेवढा प्रचार करण्यात आला नाही. शुक्रवारी व शनिवारी उमेदवारांकडून गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या शहरांमध्ये प्रचार रॅली काढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते बोलावून शहरात गर्दी करून आपली ताकद अधिक दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. शुक्रवारी व शनिवारी पक्षांच्या रॅलींनी शहरे गजबजून जाण्याची शक्यता आहे.
शनिवारनंतर केला जाणार छुपा प्रचार
मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या वेळेपासून ४८ तासांपूर्वी प्रचार बंद करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाते. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाहीर व खुलेआम प्रचार बंद होणार असला तरी उमेवार व त्यांचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचार करतील. हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम करण्याची जबाबदारी गावातील जबाबदार कार्यकर्त्यावर दिली जाते. विशेष म्हणजे रविवारी रात्री सुद्धा मतदारांच्या भेटी घेतल्या जातील. ग्रामीण भागात हे प्रकार अधिक प्रमाणात घडतात.