Maharashtra Election 2019 : चार लढती ठरल्या अटीतटीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:28 AM2019-10-08T00:28:34+5:302019-10-08T00:28:53+5:30

दिगांबर जवादे। लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या चार लढती अतिशय अटीतटीच्या ठरल्या होत्या. विजयी उमेदवारांना निसता ...

Maharashtra Election 2019 : Four battles were made on conditional basis | Maharashtra Election 2019 : चार लढती ठरल्या अटीतटीच्या

Maharashtra Election 2019 : चार लढती ठरल्या अटीतटीच्या

Next
ठळक मुद्देगडचिरोली विधानसभा : १९७८, १९८५, १९९०, २००९ मध्ये झाल्या रंगतदार लढती


दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या चार लढती अतिशय अटीतटीच्या ठरल्या होत्या. विजयी उमेदवारांना निसता विजय प्राप्त झाला. निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते श्वास रोखून निकालाची प्रतीक्षा करीत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर एकच जल्लोष कार्यकर्ते करीत होते, असा अनुभव जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये विधानसभेसाठी राज्यभरात पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. पहिल्या निवडणुकीच्या वेळी गडचिरोलीऐवजी धानोरा मतदार संघ होता. १९६२ ते २०१४ पर्यंत एकूण १२ वेळा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १९७८, १९८५, १९९० व २००९ मधील लढती अतिशय अटीतटीच्या ठरल्या होत्या. १९७८ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) पक्षाचे देवाजी तानू मडावी यांना विजय प्राप्त केला होता. त्यांना २६ हजार ४८५ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार सत्यवानराव आत्राम हे पराभूत झाले होते. त्यांना २४ हजार ३९६ मते मिळाली होती. मडावी व आत्राम यांच्या मतांमध्ये केवळ २ हजार ८९ एवढ्या मतांचा फरक होता. मडावी यांच्या तुलनेत आत्राम यांना केवळ ३.४९ टक्के मते कमी मिळाली होती.
१९८५ मध्ये जनता पार्टीचे हिरामन बेंडूजी वरखडे हे विजयी झाले होते. काँग्रेसचे पराभूत उमेदवार मारोतराव कोवासे यांना २७ हजार ५५९ मते मिळाली होती. वरखडे यांना कोवासे यांच्या पेक्षा केवळ ८६८ मते अधिक मिळाली होती. १९९० मध्ये काँग्रेसचे उमेदवार मारोतराव कोवासे यांना ३७ हजार ९०३ मते मिळाली होती. ते विजयी झाले होते. शिवसेनेचे उमेदवार विलास कोडाप यांना ३४ हजार ८०० मते मिळाली होती. कोवासे यांना कोडाप यांच्या पेक्षा ३ हजार १०३ मते अधिक मिळाली होती. २००९ मध्ये काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी व भाजपचे अशोक नेते यांच्यामध्ये काट्याची लढत झाली होती. ही लढत आजच्या नवीन पिढीच्या अजूनही स्मरणात आहे. डॉ.उसेंडी यांना ६७ हजार ५४२ मते मिळाली होती. तर अशोक नेते यांना ६६ हजार ५८२ मते मिळाली होती. डॉ.उसेंडी यांना नेते यांच्या पेक्षा केवळ ९६० मते अधिक मिळाली. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ०.६२ टक्के एवढे होते.
अटितटीच्या लढतीमध्ये फेरीनिहाय उमेदवारांची मते एकदुसऱ्या पेक्षा कमी जास्त होत असल्याने उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्ते यांची उत्कंठा ताणली जाते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी या चार लढती संस्मरणीय ठरल्या आहेत. दोन तुल्यबळ उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्यानंतर अशाप्रकारच्या लढती बघायला मिळतात. थोड्याफार फरकाने उमेदवार पराभूत झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून पुन्हा मतदान मोजणीची मागणी होत होती.

पहिल्या निवडणुकीत होत केवळ ६० हजार मतदार
पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६२ मध्ये पार पडली. त्यावेळी गडचिरोली ऐवजी धानोरा मतदार संघ होता. एकूण मतदार ६० हजार ३५६ होते. एकूण ३४ हजार ३८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सिरोंचा विधानसभा क्षेत्रात एकूण ६३ हजार ७७९ मतदार होते. त्यापैकी ४३ हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकूण ७३ हजार १८१ मतदार होते. त्यापैकी ४३ हजार १११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

 

Web Title: Maharashtra Election 2019 : Four battles were made on conditional basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.