Maharashtra Election 2019 ; अनेक वेळा मतदारांचा कौल विरोधी पक्षाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:31+5:30
गडचिरोली मतदार संघात सन १९६२ पासून ते आतापर्यंत निवडून आलेले बहुतांश आमदार विरोधी पक्षातच बसलेले आहेत. सन १९८०, १९९०, २००९ तसेच २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे होते. या चार निवडणुकांचा अपवाद वगळता बहुतांशवेळा गडचिरोलीचे आमदार विरोधी पक्षाचे होते.
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : अहेरी, गडचिरोली, आरमोरी या तिनही विधानसभा मतदार संघामध्ये सन १९६२ च्या पहिल्या निवडणुकीपासून तर २०१४ पर्यंत झालेल्या एकूण १२ निवडणुकीचे निरीक्षण केल्यास आरमोरी मतदार संघातील सर्वाधिक आमदार सत्ता पक्षात तर अहेरी व गडचिरोली या दोन मतदार संघातील आमदार अधिकाधिक वेळा विरोधी पक्षात बसल्याचे दिसून येते.
अहेरी मतदार संघात अधिकाधिक आमदार हे विरोधी पक्षात बसले. मात्र सन १९७२, १९८०, १९९० व २०१४ या चार निवडणुकीमध्ये विजयी झालेले आमदार हे सत्तापक्षात बसले होते. या मतदार संघातील मतदारांचा कौल हा सत्तेबाहेरच्या आमदाराला निवडून देण्याचा दिसतो.
गडचिरोली मतदार संघात सन १९६२ पासून ते आतापर्यंत निवडून आलेले बहुतांश आमदार विरोधी पक्षातच बसलेले आहेत. सन १९८०, १९९०, २००९ तसेच २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे होते. या चार निवडणुकांचा अपवाद वगळता बहुतांशवेळा गडचिरोलीचे आमदार विरोधी पक्षाचे होते.
आरमोरी मतदार संघात १९६२ ला काँग्रेसचे जगन्नाथ टेमसाजी म्हशाखेत्री, १९६७ ला दिनाजी नारनवरे, १९७२ मध्ये बाबुराव नारायण मडावी, २००४ व २००९ ला आनंदराव गेडाम, १९८० ला बाबुराव नारायण मडावी व १९८५ मध्ये पुंडलिक उईके आमदार म्हणून निवडून आले व हे सर्व आमदार सत्तापक्षात बसले. १९९५ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे झाले होते. त्यावेळी आरमोरी मतदार संघातून १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ.रामकृष्ण मडावी आमदार झाले होते तर २०१४ मध्ये सर्वाधिक जागा मिळवून भाजपचे मुख्यमंत्री झाले. या मतदार संघातून कृष्णा गजबे आमदार झाले.
सन १९८० ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी याच पक्षाचे उमेदवार तिनही मतदार संघात आमदार म्हणून निवडून आले. २०१४ ला भाजप-सेना युतीचे सरकार महाराष्ट्रात बसले. यावेळी जिल्ह्यातील तीनही आमदार सत्ताधारी पक्षाचे निवडून आले.
एकूणच आरमोरी मतदार संघ हा सत्ताधारी पक्षाला कौल देणारा तर गडचिरोली व अहेरी मतदार संघ बहुतांश वेळा विरोधी पक्षाला कौल देणारा ठरला.
१९७८ ला लोकशाही दलाची सत्ता
सन १९७८ च्या निवडणुकीत पुरोगामी लोकशाही दलाचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. त्यावेळी आरमोरी मतदार संघातून अपक्ष उमेदवार दिनाजी विठोबा नारनवरे विजयी होऊन आमदार झाले. १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. त्यावेळी या क्षेत्रातून सेनेचे हरिराम वरखडे आमदार झाले. १९९९ ला काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी शिवसेनेचे रामकृष्ण मडावी आमदार झाले. १९७८, १९९० व १९९९ या तीन निवडणुकींचा अपवाद वगळता आरमोरी मतदार संघाने सत्ताधारी पक्षालाच अधिक कौल दिल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यातील तीनही मतदार संघ अनुसूचित जमातीकरिता राखीव आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून या समाजातील काही मोजक्याच पुढाऱ्यांना संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.