Maharashtra Election 2019 ; अहेरीत तीन तिघाडा, काम बिघाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:34+5:30
वास्तविक गेल्या १० वर्षांपासून आमदारकी मिळण्यापासून हुलकावणी बसत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा यांना यावेळची निवडणूक जिंकणे फारसे कठीण नव्हते. परंतू या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावे असे म्हणत ते भाजपकडे आस लावून बसले होते. त्यात झालेला टाईमपास त्यांना खूप अखरणारा ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा परंपरागत लढतीत यावेळी काँग्रेसने उडी घेऊन दुहेरी लढतीला तिहेरी केले. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असलेल्या पेसा क्षेत्रातील ग्रामसभांच्या पाठिंब्यामुळे कोणत्या उमेदवाराचे विजयाचे गणित बिघडणार याचा अंदाज बांधणे राजकीय धुरंधरांसाठी कठीण झाले आहे. तरीही मतांच्या विभागणीचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
वास्तविक गेल्या १० वर्षांपासून आमदारकी मिळण्यापासून हुलकावणी बसत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा यांना यावेळची निवडणूक जिंकणे फारसे कठीण नव्हते. परंतू या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावे असे म्हणत ते भाजपकडे आस लावून बसले होते. त्यात झालेला टाईमपास त्यांना खूप अखरणारा ठरला. त्याच गडबडीत काँग्रेसने आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते, माजी आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेसच्या तिकीटवर उभे करून आघाडीत बिघाडी केली.
तिकडे विद्यमान आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर करून भाजपने आपली खेळी यशस्वी केली. आता या तीनही उमेदवारांच्या तुल्यबळ लढतीमुळे अहेरी क्षेत्रातील वातावरण तापले आहे.
अम्ब्रिशराव यांनी पालकमंत्री म्हणून काम करताना विविध कामांसाठी बराच निधी खेचून आणला. पण सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचे टेक्निक त्यांना फारसे जमले नाही. शेवटच्या टप्प्यात तो प्रयत्नही त्यांनी केला. मात्र हे काम आधी केले असते तर त्यांना अधिक फायदा झाला असता. दीपक आत्राम यांनी आपले खंदे समर्थक असलेले जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मदतीने बऱ्याच भागात आदिवासी विद्यार्थी संघाचे जाळे विणले. तरी पूर्ण मतदार संघ काबिज करणे त्यांना शक्य झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेटवर्क त्या तुलनेत जास्त आहे. अशा तुल्यबळ लढतीत कोणीही खूप फरकाने बाजी मारेल याची शक्यता नाही. एकूणच प्रत्येकाला आपापली ताकत पणाला लावावी लागत आहे. अशा अटीतटीच्या वातावरणात काँग्रेसच्या कोणत्या मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची एक सभा झाली.
शुक्रवारी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा अहेरीत होणार आहे. या सभेनंतर अहेरीत कोणता माहौल तयार होतो यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.