महाविकास आघाडी समर्थित उमेदवारांचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:59+5:302021-01-23T04:37:59+5:30
ठिकठिकाणच्या तालुका मुख्यालयी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाची उत्सुकता सर्वांना असल्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणाबाहेर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी ...
ठिकठिकाणच्या तालुका मुख्यालयी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाची उत्सुकता सर्वांना असल्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणाबाहेर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. जसजसी ग्रामपंचायतनिहाय निकाल जाहीर केले जात होते तसतसा बाहेरील समर्थकांमध्ये जल्लोष केला जात होता. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणचे निकाल जाहीर झाले; परंतु निकालपत्र भरून ते ऑनलाइन अपलोड करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या निवडणुकीत एकूण ५३९३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी उत्तर भागातील ६ तालुक्यांमध्ये १७० ग्रामपंचायतींत २,५७८ उमेदवार, तर दक्षिण भागातील ६ तालुक्यांमध्ये १५० ग्रामपंचायतींमध्ये २,८१५ उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. एकूण ३२० ग्रामपंचायतींमध्ये ४ लाख ७६ हजार ७७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दक्षिण गडचिरोलीतही अनेक तालुक्यांमध्ये महाविकास आघाडी समर्थित उमेदवारांना बऱ्यापैकी यश मिळाले. मात्र, चामोर्शी, अहेरी तालुक्यात अनेक ठिकाणी भाजप समर्थित उमेदवारांनीही बाजी मारली.
(बॉक्स)
देसाईगंज तालुक्यात संमिश्र यश
देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले. याच तालुक्यात मतदानाची सर्वाधिक चुरस होती. आरमोरी विधानसभा मतदारसंघात देसाईगंज आणि कुरखेडा तालुक्यात महाविकास आघाडीतील पक्षांच्या समर्थकांनी बऱ्याच प्रमाणात आगेकूच केली. आरमोरी तालुक्यात पोरेड्डीवार गटाच्या लोकविकास मंचप्रणीत उमेदवारांनी अनेक गावांत विजय मिळविला. त्यात वैरागड, मानापूर, वडधा, देलोडा, इंजेवारी, डोंगरसावंगी, सातगाव, चुरमुरा, ठाणेगाव, मोहझरी, पळसगाव, शंकरनगर, परसवाडी, वघाळा आणि भाकरोंडी आदी गावांचा समावेश आहे.
आता सरपंचपदाच्या सोडतीची प्रतीक्षा
यावेळी पहिल्यांदाच निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाची सोडत होत आहे. निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडायचा आहे. त्यामुळे ज्या गटाचे जास्त सदस्य असतील त्याच गटाचा सरपंच होणार आहे. त्यामुळे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते, महिला उमेदवारासाठी राखीव राहते की खुल्या प्रवर्गासाठी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.