११ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे सरपंच-उपसरपंच विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:35 AM2021-02-14T04:35:10+5:302021-02-14T04:35:10+5:30
कोरची : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतपैकी पहिल्या टप्प्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक १२ व १३ फेब्रुवारीला पार पडली. या ...
कोरची : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतपैकी पहिल्या टप्प्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक १२ व १३ फेब्रुवारीला पार पडली. या निवडणुकीत ७ सरपंच पदावर काँग्रेसचे तर दोन राष्ट्रवादी, शिवसेना एक, एक ग्रामसभा अशा एकूण ११ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी समर्थित सरपंच-उपसरपंच तर सहा ग्रामपंचायतीवर भाजप समर्थीत सरपंच विराजमान झाले आहेत.
काेरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतपैकी १८ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी चार ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवड झाली. यानंतर १४ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झाली. सरपंच व उपसरपंच पदासाठी शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत मार्केकसा ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी एकही फार्म भरला नाही. त्यामुळे येथील पद रिक्त राहिले. मात्र ग्रामपंचायतीमध्ये १४ फेब्रुवारीला पुन्हा निवडणूक घेणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यात काही ग्रामपंचायती भाजपच्या गढ हाेत्या. परंतु काँग्रेसने मुसंडी मारली तर काँगेसचे गढ मानल्या जाणाऱ्या ग्राम पंचायतीत भाजपने मुसंडी मारुन आपले सरपंच बसविले. कोरची तालुक्यांत सरपंच-उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीला वर्चस्व मिळाल्याने राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. भाजप समर्थीत ग्रामपंचायतींमध्ये अल्लीटोला, नांदळी, नवरगाव, कोटगूल, बोरी, अरमुरकसा तर महाविकास आघाडीतील काँग्रेस समर्थीत ग्रामपंचायतींमध्ये बिहितेकला, कोसमी नंबर २, कोचीनारा, टेमली, बेतकाठी, राष्ट्रवादी समर्थीत ग्रामपंचायतीमध्ये मसेली व सोनपूर तर महाविकास युतीचे बेळगाव व बेतकाठी तसेच ग्रामसभा एक आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
बाॅक्स...
वादग्रस्त बाेरी ग्रा.पं.मध्ये बिनविराेध निवड
काेरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतमध्ये काही दिवसांपूर्वी गोंधळ उडाला हाेता. येथील गावकऱ्यांनी मागील पाच वर्षांतील ग्रा.पं.च्या विकास कामांचा माजी सरपंच व ग्रामसेवकांना हिशेब मागितला हाेता. हिशेब न दिल्याने गावकऱ्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीला कुलूप ठाेकले होते. परंतु याबाबत कोरचीचे बीडीओ देविदास देवरे यांनी १८ फेब्रुवारीला आपल्या सर्व समस्यांचे निवारण केले जाणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर गावकऱ्यांनी सरपंच-उपसरपंचा पदाच्या निवडणुकीला असलेला विरोध मागे घेतला. त्यामुळे शनिवारी बाेरी ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.