अहेरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना महावितरणचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:42 AM2017-07-18T00:42:15+5:302017-07-18T00:42:15+5:30
जवळपास ३० हजार रूपयांचे वीज देयक प्रलंबित असल्याच्या कारणावरून महावितरणने अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वीज पुरवठा मीटर काढून बंद केला होता.
२५ दिवसानंतरही वीज नाही : जिल्हा प्रशासनाकडून बेदखल
विवेक बेझलवार । लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जवळपास ३० हजार रूपयांचे वीज देयक प्रलंबित असल्याच्या कारणावरून महावितरणने अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वीज पुरवठा मीटर काढून बंद केला होता. मात्र बिल भरून २५ दिवसांचा कालावधी उलटूनही महावितरणने वीज मीटर बसवून येथील वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही. परिणामी अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा पूर्णत: बंद आहे.
वीज पुरवठा खंडित केल्यानंतर ‘लोकमत’मध्ये बातमी झळकताच पालकमंत्र्यांसह नगर पंचायत, नगर विकास विभाग आणि जिल्हा प्रशासन हादरून गेले. लोकमतमधील वृत्ताचा संदर्भ देत पालकमंत्र्यांनी बिल भरण्याचे निर्देश दिले. नगर पंचायत प्रशासनाने लगेच थकीत देयक अदा केले. मात्र त्यानंतरही कॅमेरे सुरू झाले नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने १५ आॅक्टोबर २०१६ ला अहेरी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराची सेवा सुरू करण्यात आली. मात्र नगर पंचायत प्रशासनाने अवघ्या ३० हजार रूपयांच्या वीज बिलाचा भरणा न केल्याने गेल्या चार महिन्यांपासून अहेरीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अहेरी शहरात गर्दीच्या २४ ठिकाणांवर या कॅमेऱ्यांची नजर राहत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सात वेगवेगळे मीटर लावण्यात आले होते. या सातही मीटरचे मिळून जवळपास ३० हजार रूपयांचे बिल नगर पंचायतीला प्राप्त झाले. मात्र नगर पंचायतीने महावितरणकडे या वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराचा वीज पुरवठा महावितरणने २३ फेब्रुवारीला खंडीत केला. तेव्हापासून कॅमेरे बंदच आहेत.
या संदर्भातील लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी लागलीच नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र पाठवून सीसीटीव्ही कॅमेराची सेवा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने विशेष बैठक बोलावून त्यात मंजुरी देऊन थकीत जवळपास ३० हजार रूपये वीज बिलाचा भरणा केला. या संदर्भात नगर पंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना २३ जून २०१७ ला पत्रानिशी कळविले. मात्र त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे महावितरणतर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मीटर बसवून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही. या साऱ्या बाबीवरून वीज पुरवठा सुरू करण्याच्या कामात किती दिरंगाई होते, याची प्रचिती येत आहे.
आजपर्यंत अहेरी येथील महावितरण कार्यालयाकडे वीज मीटर उपलब्ध नव्हते. मात्र आता वीज मीटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात अहेरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या यंत्रणेसाठी सर्व मीटर लावून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.
- अमित शेंडे, सहायक अभियंता, वीज वितरण विभाग, अहेरी