२ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदानाचा महायज्ञ; ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 05:00 AM2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:36+5:30
गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक वेळा रक्त द्यावे लागते. परंतु कोरोना काळात रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने आणि कोणत्यातरी निमित्ताने स्वत: रुग्णालयात जाऊन रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गरजवंतांना रक्त मिळणे कठीण होत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात लोकमत समूहाच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही २ ते १५ जुलै यादरम्यान विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या रक्तदान महायज्ञानिमित्त जारी करण्यात आलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या लोगोचे अनावरण केले.
गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक वेळा रक्त द्यावे लागते. परंतु कोरोना काळात रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने आणि कोणत्यातरी निमित्ताने स्वत: रुग्णालयात जाऊन रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गरजवंतांना रक्त मिळणे कठीण होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकमतच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून या उपक्रम जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविला जाणार आहे.
आरमोरी येथील शिबिरासाठी जय दुर्गा मंडळाचे मनोहर मोटवानी, सुदाम मोटवानी यांनीही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगत लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षात सामाजिक बांधिलकी
लोकमतच्या वाटचालीला ५० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत लोकमतने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतने पुढाकार घेत या उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७४९९९०४७६४ या क्रमांकावर फोन करून आपल्या नावाची नोंदणी करावी.