सावधान... नाहीतर फुलांच्या ‘माेहा’त हिंस्त्र घेतील जीव!
By गेापाल लाजुरकर | Published: March 23, 2023 04:09 PM2023-03-23T16:09:52+5:302023-03-23T16:11:11+5:30
वाघ-बिबट्यांसह अस्वलांची दहशत : दाेन वनविभागांत सर्वाधिक धाेका
गडचिरोली : हिरव्यागर्द वनराईत बिनधास्तपणे व्यक्ती फिरू शकेल, अशी स्थिती गत पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात हाेती. मात्र, चार वर्षांपूर्वीपासून ती बदलली. आता ती स्थिती राहिली नाही. चार वर्षांपासून जिल्ह्यात वाघांसह बिबट व अस्वलांचा वावर वाढल्याने जंगलातच नव्हे, तर शेतशिवारांतही जाणे धाेकादायक ठरत आहे. नुकतीच माेहफूल संकलनाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच माेहफूल संकलनाचे काम केले जात असल्याने सर्वाधिक गडचिराेली, वडसा वनविभागांत, तर काही प्रमाणात अन्य वनविभागांत माेहफूल वेचणाऱ्या लाेकांवर वाघ, बिबट व अस्वलांच्या हल्ल्याचा धाेका आहे.
गडचिराेली जिल्ह्यात जंगलासह शेतीच्या बांधावर व रस्त्यालगत माेठ्या प्रमाणावर माेहाची झाडे आहेत. शेतकऱ्यांसह शेतमजूर जंगलातील व शेतीच्या बांधावरील माेहफूल वेचणीसाठी जातात. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच माेहफूल संकलनाला सुरुवात हाेते. हा हंगाम जवळपास एक महिना चालताे. म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत माेहफूल वेचणी सुरू असते. पाच वर्षांपूर्वी कुठेही, काेणत्याही ठिकाणी माेहफूल वेचणीसाठी नागरिक जात असत; परंतु गत चार वर्षांपासून जिल्ह्यात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्याची विदारक स्थिती निर्माण झाल्याने काेणतेही नागरिक सध्यातरी रात्रीच्या सुमारास किंवा पहाटे माेहफूल वेचण्यासाठी शेतशिवारातसुद्धा जाण्यास धजावत नाही. विशेष म्हणजे, वनविभागाकडून नागरिकांमध्ये रात्रीच्या सुमारास जंगलात न जाण्याबाबत व माेहफूल संकलन सतर्कतेबाबत जागृती केली जात आहे.
माेहफूल वेचताना काय दक्षता घ्यावी?
माेहफूल वेचण्यासाठी मध्यरात्री, तसेच पहाटे नागरिक शेतात अथवा जंगल परिसरात जातात. अशावेळी हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ला हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. एकट्याने जंगलात जाऊ नये. तीन, चारच्या गटाने आवाज करीत जावे. वाघ, बिबट दिसल्यास जाेरजाेराने आवाज करावा. पाणवठ्याजवळ जाताना सावधगिरी बाळगावी. विशेषत: सकाळी ८ ते ९ वाजता माेहफूल संकलनासाठी जावे. तसेच दुपारी ३ वाजेच्या आत परत यावे, असे आवाहन वन्यजीवप्रेमी तथा पीपल फाॅर एन्व्हायर्नमेंट अँड ॲनिमल वेलफेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांनी केले.
गडचिराेली वनविभागात ६, तर वडसात २१ वाघांचा वावर
गडचिराेली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, अमिर्झा, राजगाटा, चुरचुरा, महादवाडी, नवरगाव, आंबेटाेला परिसरात एकूण सहा वाघांचा सध्या वावर आहे. वाघांमध्ये जी-१, जी-१०, एसएएम-८२, जी-१६ आदी नर वाघांचा, तर जी-२ व जी-५ (टी-६) आदी मादी वाघांचा समावेश आहे. जी-२ वाघिणीला दाेन बछडे असून, ते तिच्यासाेबत वावरताना दिसतात. ही बाब ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट हाेते. वडसा वनविभागात एकूण २१ वाघांचा वावर आहे. हे वाघ गडचिराेली तालुक्यासह कुरखेडा तालुक्यातील जंगलातसुद्धा ये-जा करीत असतात.
‘ते’ दाेन बछडे कुठे झाले गायब?
टी-६ वाघिणीच्या चार बछड्यांपैकी दाेन बछड्यांचा मृत्यू दाेन महिन्यांपूर्वी झाला हाेता. त्यानंतर दाेन बछडे जिवंत हाेते; परंतु ते बछडे आता वनविभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये येत नाहीत. अन्य हिंस्त्र प्राण्यांकडून त्या बछड्यांची शिकार तर झाली नसावी ना, असा प्रश्न पडताे.
गणेशपूर व जेप्रातील महिलेने गमावला जीव
गडचिराेली तालुक्यातील जेप्रा येथील महिलेला मागील वर्षी २०२२ मध्ये माेहफूल संकलन करताना वाघाने ठार केले हाेते. तर अशीच एक घटना आरमाेरी तालुक्याच्या गणेशपूर येथे २०२१ मध्ये घडली. माेहफूल संकलन करणाऱ्या महिलेला गणेशपूरच्या जंगलात वाघाने ठार केले हाेते.