आधुनिक संप्रेषण साधनांच्या वापरामुळे पत्रपेट्यांचा विसर
By Admin | Published: May 25, 2014 11:33 PM2014-05-25T23:33:49+5:302014-05-25T23:33:49+5:30
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाने अनेक क्षेत्रात बर्या प्रमाणात प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळात संप्रेषणाचे साधन म्हणून चिठ्ठया, पत्रे यासह अनेक प्रकारच्या साधनांचा वापर मानव करीत होता.
विसोरा : आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाने अनेक क्षेत्रात बर्या प्रमाणात प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळात संप्रेषणाचे साधन म्हणून चिठ्ठया, पत्रे यासह अनेक प्रकारच्या साधनांचा वापर मानव करीत होता. पत्र पाठविण्याची पध्दत मागील दहा वर्षापर्यंत जोरात होती. परंतु सध्या काळात आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर वाढल्याने पत्र पाठविणे तर बंदच झाले आहे. शिवाय अनेक गावातील पत्रपेट्या अडगळीत पडल्या आहेत. जगात झालेल्या मोबाईल क्रांतीमुळे एका क्षणात लाखो किमी अंतरावरील व्यक्तीशी थेट संपर्क साधता येतो. त्यामुळे मानव मोबाईलच्या प्रेमात अधिकच पडला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील पत्रपेटीची ही अवस्था अतिशय दयनीय आहे. पत्रपेटी भिंतीवर अडकवून तशीच टांगून ठेवलेली आहे. क्वचितच नागरिक पेटीत पत्र टाकतांना आढळून येतात. तालुक्यातील कुरूड येथील एका घराच्या भिंतीवर पत्रपेटी अडकवून ठेवली आहे. परंतु जणूकाही पत्रपेटी अडगळीत फे कल्याच्या अवस्थेत आहे. सध्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अप ई-मेल आदी वेगवान संप्रेषण साधनांचा वापर सर्वाधिक वाढला आहे. तरूण वर्गही नवनवीन संप्रेषण साधनांच्या वापराकडे जलदगतीने वळत असल्याने पारंपरीक संप्रेषण साधनांची अवस्था इतिहास जमा होण्याइतपत झाली आहे. पोष्टाच्या ठिकाणी असलेल्या पत्रपेट्या याच अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या पत्रपेट्या गंजलेल्या अवस्थेत असल्याने नवीन पत्रपेट्या लावण्यांसंदर्भात पोष्ट विभाग उदासिन असल्याचे दिसून येत आहे. एकूणच पारंपरीक संप्रेषणाचे साधन म्हणून ओळखले जाणारे पत्र आज कमी वापर होत असल्याने विसर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)