नक्षल्यांना स्फोटक साहित्य पुरविणाऱ्या मुख्य आरोपीला तामिळनाडूतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 03:07 PM2022-08-24T15:07:50+5:302022-08-24T15:08:33+5:30
तीन दिवसांचा पीसीआर, चार आरोपींना आधीच अटक
गडचिरोली : नक्षलवाद्यांना स्फोटकात वापरले जाणारे साहित्य अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा या गावात लपवून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी श्रीनिवास गावडे याला तामिळनाडू राज्यातून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या आणि नक्षल समर्थक म्हणून ठपका बसलेल्या आरोपींची संख्या ९ वर गेली असून, चार जणांना आधीच अटक झालेली आहे.
तामिळनाडूतून ताब्यात घेतलेल्या गावडे याला सोमवारी अहेरीत आणण्यात आले. त्याला न्यायालयाने ३ दिवसांचा पीसीआर दिला आहे. पोलिसांनी यापूर्वी सदर गावातून स्फोटकात वापरल्या जाणाऱ्या वायरचे बंडल व इतर साहित्य जप्त केले होते. तसेच तेलंगणाच्या आसिफनगर येथून राजू गोपाल सल्ला, मोहम्मद कासिम शादुल्ला, तसेच भंगारामपेठातील काशिनाथ ऊर्फ रवी मुल्ला गावडे, साधू लच्छा तलांडी या चार आरोपींना अटक केली होती. मात्र श्रीनिवास गावडे हा फरार झाला होता.
तो तामिळनाडू राज्यात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेऊन अहेरीत आणले. त्याला २५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.