चामोर्शी मुख्य डांबरी मार्ग पुन्हा गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:11 AM2018-08-21T00:11:18+5:302018-08-21T00:12:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी व इतर मुख्य रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसाने चामोर्शीसह सर्वच मुख्य मार्गाच्या खड्ड्यावरील मुरूम गायब झाला आहे. पुन्हा शहरातील मुख्य डांबरी रस्ते खड्ड्याच्या विळख्यात सापडले आहेत. चामोर्शी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणावरून चामोर्शी, धानोरा, आरमोरी व चंद्रपूरकडे मुख्य मार्ग जातात. या मार्गाने दुचाकीसह सर्वच चारचाकी व जड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. जड वाहनांच्या वर्दळीमुळे सदर मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली. चामोर्शी मार्गावरील डाक कार्यालयापासून शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावरील बºयाच खड्ड्यांची खोली दीड ते दोन फूट आहे. आता पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असल्याने वाहनधारकांना सायंकाळी व रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यातून वाहन गेल्यावर यातील घाणपाणी अंगावर उडत आहे.
चामोर्शी मार्गाने आवागमन करणारी अनेक वाहने भंगार होण्याच्या मार्गावर आहेत. आरमोरी मार्गावर कठाणी नदीच्या अलिकडे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. शिवाय कठाणी नदीच्या पुलावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. या पुलाला कठडे नसल्याने येथे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाºया चंद्रपूर मार्गावरून तलावाकडून गोकुलनगरकडे जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील खोल खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विसापूर व विसापूर टोलीकडे जाणाºया मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कारमेल शाळेच्या मागील परिसरातील अंतर्गत रस्तेही चिखलाच्या विळख्यात सापडले आहे. चामोर्शी मार्गावरून पोटेगावकडे जाणारा मार्गही खड्डेमय बनला आहे. पोटेगाव मार्गावरील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले. मात्र दमदार पावसाने पुन्हा खड्डे जैसे थे झाले.
चामोर्शी मार्ग खड्डेमय बनल्यामुळे शाळकरी मुले, मुली व महिलांना दुचाकी नेण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वाराला अपघात होऊन किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. शहरातील वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने चामोर्शी मार्गावरील खड्ड्यांमध्ये बारीक चुरी टाकून खड्डे बुजवावे, सदर रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
महावितरणतर्फे भूमिगत विद्युत लाईन टाकण्याचे काम उन्हाळ्यात व्हायला पाहिजे होते. मात्र विलंब झाल्याने रस्ते बुजवूनही पावसाने खड्डे पुन्हा जैसे थे झाले. पालिकेच्या वतीने पोटेगाव बायपास, शिवाजी महाविद्यालयाकडून जाणारा बायपास व गोकूलनगर तलाव बायपास या तीन मार्गाचे काम मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया आटोपली आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच विविध विकासकामे जोमात सुरू होतील. शहर विकासाबाबत आपण दक्ष व आग्रही आहोत.
- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, गडचिरोली
भूमिगत विद्युत लाईनमुळे रस्त्याची वाट