शहरातून जाणारे मुख्य मार्ग बकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:59 AM2017-10-12T00:59:57+5:302017-10-12T01:00:09+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी-गडचिरोली, गडचिरोली-आरमोरी या मुख्य डांबरी मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात या मार्गावर खड्डे निर्माण झाले. त्यानंतर सदर मार्गाची प्राधिकरणाकडून थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली. पुन्हा जोरदार झालेल्या पावसाने हे मुख्य राष्टÑीय महामार्ग जैसे थे झाले. त्यानंतर स्थानिक नगर पालिका प्रशासनाने मुरूम व विटाची माती टाकून चामोर्शी मार्गावरील खड्डे बुजविले. आता खड्ड्यांचा आकार २ फूट खोल व ३ फूट रूंद असा झाला आहे. मोठ्या स्वरूपाचे खड्डे निर्माण झाल्याने बसमधील तसेच इतर खासगी वाहनातील प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
गडचिरोली शहरात बायपास मार्ग विकसित करण्यात आले नाही. त्यामुळे अहेरी, सिरोंचा, भामरागडकडे जाणारे ओव्हरलोड ट्रक चामोर्शी मार्गे आवागमन करतात. त्यामुळे मुख्य मार्गाची अशी दुरवस्था झाली आहे. आरमोरी व धानोरा मार्गाचीही अवस्था याहीपेक्षा दयनिय आहे.
पोटेगाव बायपास मार्गावर जीवघेणे खड्डे
स्थानिक इंदिरा गांधी चौकातून चामोर्शीमार्गे रेड्डी गोडाऊन परिसरातून पोटेगाव मार्गाला जोडणाºया रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या मार्गावरील मुलींच्या वसतिगृहासमोर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. सदर खड्डे सुरुवातीला मुरूम टाकून बुजविण्यात आले. त्यानंतर येथे डांबराची छुर्री टाकून सपाटीकरण करण्यात आले. मात्र जोरदार बरसलेल्या पावसाने मुरूम व छुर्री गायब केली. आता सदर खड्ड्यांचा आकार प्रचंड वाढला आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गावरील पथदिवे बंद झाल्यास वाहनधारकाचा अपघात या ठिकाणी निश्चित आहे. त्यामुळे या मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.