मैत्रेयच्या एजंटची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:20 AM2018-04-04T01:20:17+5:302018-04-04T01:20:17+5:30
मैत्रय कंपनीत ज्या नागरिकांनी पैसे गुंतविले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी मैत्रेय कंपनीच्या प्रतिनिधी व ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मैत्रय कंपनीत ज्या नागरिकांनी पैसे गुंतविले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी मैत्रेय कंपनीच्या प्रतिनिधी व ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
मैत्रेय सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने काही वर्षांपूर्वी गडचिरोली येथे कार्यालय स्थापन केले. सेबीने २०१३ मध्ये आर्थिक व्यवहार बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र कंपनीने याबाबत प्रतिनिधींना कळविले नाही. ठेवीदारांचे पैसे दुसरी कंपनी स्थापन करून त्या कंपनीमध्ये वळविले. न्यायालयाच्या निर्देशानुसार कंपनीची मालमत्ता विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांचे जवळपास आठ कोटी रूपये परत करण्यात आले आहेत. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील एकाही ठेवीदाराचे पैसे परत झाले नाही. मैत्रयमध्ये प्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त महिला कार्यरत होत्या. ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याने प्रतिनिधींना मानसिक त्रास होत आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आंदोलनाचे नेतृत्व रूचित वांढरे, आनंदराव पिपरे, आशिष ब्राह्मणवाडे, कल्पना म्हशाखेत्री, प्रिती नरूले, अर्चना कोटांगले, विनोद बांबोळे, विलास कांबळे यांनी केले.