पर्यायी व्यवस्था करा, आम्ही पानठेले बंद करतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:56 AM2018-02-11T00:56:02+5:302018-02-11T00:56:23+5:30
आम्ही शिक्षण घेतले तरी नोकरीसाठी जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत. इतर स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँका कर्ज देण्यास तयार नाही. म्हणून नाईलाजाने कमी गुंतवणुकीत केला जाणारा पानठेल्याचा व्यवसाय स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आम्ही शिक्षण घेतले तरी नोकरीसाठी जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत. इतर स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँका कर्ज देण्यास तयार नाही. म्हणून नाईलाजाने कमी गुंतवणुकीत केला जाणारा पानठेल्याचा व्यवसाय स्वीकारला. संपूर्ण राज्यात आणि देशातील पानठेल्यांप्रमाणेच आम्ही बंदी असणाऱ्या सुगंधित तंबाखूला टाळून साध्या तंबाखूचा खर्रा, पान विक्रीचा व्यवसाय करतो. तरीही इतर कोणत्याच जिल्ह्यात नसणारी ही सक्ती आमच्यावरच का लादली जात आहे? आम्हाला पर्यायी रोजगार किंवा स्वयंरोजगाराची व्यवस्था करून द्या, आम्ही पानठेलेच बंद करतो, अशी व्यथा गडचिरोली शहरातील पानठेलेचालकांनी ‘लोकमत व्यासपिठा’वरील परिचर्चेत बोलताना मांडली.
गेल्या आठवडाभरापासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गडचिरोली शहरात राबविल्या जात असलेल्या खर्रा आणि सुगंधित तंबाखूविक्रीविरूद्धच्या मोहिमेने तमाम पानठेलेचालक त्रस्त झाले आहेत. बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूसोबत साधा तंबाखू, सुपारी व खर्रा घोटण्याची मशिन असे साहित्य जप्त केले जात आहे. या मोहिमेमुळे धास्तावलेल्या पानठेलेचालकांना व्यवसाय करणे कठीण झाल्यामुळे ते पानठेलाच बंद ठेवत आहेत. आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी ५०० ते ६०० व्यावसायिकांनी शुक्रवारी गडचिरोलीत मोर्चाही काढला. पण प्रशासनावर काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे एकट्या गडचिरोली शहरात २०७० पानठेलेचालक व त्यांच्यावर विसंबून असलेले त्यांचे १० हजार कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत कार्यालयात या पानठेलेचालकांनी परिचर्चेतून आपली व्यथा मांडली.
या चर्चेत बोलताना ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच शासनाने पानठेल्यांवर गोळ्या, बिस्कीट, चॉकलेट, पाणी बॉटल, पाणी पाऊच, कोल्ड्रींक विक्रीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे पान विक्री किंवा तंबाखूच्या पुड्या विक्री हा एकमेव पर्याय उरला आहे. आम्ही नियमानुसार १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूविक्री करीत नाही. शिवाय बंदी असलेला सुगंधित तंबाखूही विकत नाही. आम्ही खर्रा विकतो म्हणून लोक खर्रा घेतात असे नाही. लोक खर्रा मागतात म्हणून आम्हाला खर्रा बनवावा लागतो. त्यामुळे लोकांची सवय बदलवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशात ७० टक्के तंबाखू गुजरातमध्ये पिकविला जातो. जर तंबाखू एवढाच घातक आहे तर त्यांच्या उत्पादनावर बंदी का घालत नाही? तंबाखूप्रमाणेच सिगारेटही घातक आहे. त्यावर बंदी का घालत नाही? सरकारला महसूल देणाऱ्या मोठ्या कंपन्यांचा तंबाखू चालतो, मग छोट्या व्यावसायातून कुटुंब चालविणाºया आमच्यासारख्या लोकांनी तंबाखू विकला तोच कसा घातक ठरतो? असे प्रश्नही या चर्चेत पानठेलेचालकांनी उपस्थित केले.
कोटपा कायदा २००३ चे पालन करून व्यावसायिकांनी पानठेले सुरू ठेवावे, कारवाईचा धाक दाखविणाऱ्यांविरूद्ध पानठेला चालकांनी पोलिसात तक्रार दाखल करावी, असे आवाहन शेकापचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते यांनी केले.
- तर दारूविक्री करायची का?
या जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी आहे. पण दारूविक्री बंद झाली का? आजही लाखो रुपयांची दारू पोलीस पकडतच आहे आणि व्यवसाय करणारे करतच आहेत. खर्ऱ्यावर पूर्णपणे बंदी घातली तर पानठेलेच बंद करावे लागतील. त्यातून बेरोजगारी वाढेल, चोरीसारखे गुन्हे वाढतील. पोटासाठी काहीतरी करावेच लागेल. मग काय आम्हीही दारूविक्रीच्या व्यवसायात उतरायचे का? असा सवाल या पानठेलेचालकांनी केला.
एमए शिकूनही चालवितो पानठेला
एमएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. पण नोकरी मिळाली नाही. इतर कोणता व्यवसाय करण्यासाठी भांडवल नव्हते. त्यामुळे १० वर्षापूर्वी पानठेला सुरू केला. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझ्यासारखे असंख्य बेरोजगार तरुण पानठेला व्यवसायात आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांचा शासन-प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भावना रवींद्र बाबाराव अवथळे या तरुणाने व्यक्त केली.
अण्णा हजारेंनी केले ते तुम्ही करून दाखवा
अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पानठेले बंद केले. पण ते करताना त्या पानठेलेचालकांना पर्यायी रोजगार दिला. इथे मात्र तशी परिस्थिती नाही. आम्हाला रोजगार दिला तर आम्हीही आनंदाने पानठेले बंद करू. अण्णांनी केले ते तुम्ही करून दाखवा, असे पानठेलेचालकांनी प्रशासन आणि सामाजिक संघटनांना उद्देशून म्हटले.