रोजगारासाठी मुद्रा लोन उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:12 AM2018-03-06T00:12:51+5:302018-03-06T00:12:51+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बेरोजगारांना मुद्रा लोन अंतर्गत कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयात खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बेरोजगारांना मुद्रा लोन अंतर्गत कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.अशोक नेते होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुद्रा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य मीना कोडाप, जिल्हा मुद्रा समितीच्या सदस्य रेखा डोळस, अधिकारी तसेच बँक अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुद्रा लोन, जनधन योजना, सुरक्षा योजना, सुकन्या योजना यासह विविध योजनांची माहिती खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. खातेदारांचे ज्या बँकेत खाते आहे त्या खातेदारांना मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरित करावे, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. तसेच आष्टी पेपर मिलमधील कामगार व जिल्ह्यातील टॅक्टरधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही खा. अशोक नेते यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारासाठी अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी दूर कराव्या. तसेच नगर परिषदेंतर्गत विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्याधिकाºयांना दिले. वडसा-गडचिरोली रेल्वे प्रकल्पाबाबत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवरही विचार करावा, तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.