स्त्रियांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:32 PM2018-03-08T22:32:57+5:302018-03-08T22:32:57+5:30
कोणताही क्षेत्र शिल्लक राहीलेले नाही, जिथे स्त्रियांचा प्रवेश झाला नाही. सर्वंकष प्रगती साधण्यासाठी आज महिला म्हणजे प्रचंड शक्तीचा स्त्रोत असल्याचे सिध्द झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कोणताही क्षेत्र शिल्लक राहीलेले नाही, जिथे स्त्रियांचा प्रवेश झाला नाही. सर्वंकष प्रगती साधण्यासाठी आज महिला म्हणजे प्रचंड शक्तीचा स्त्रोत असल्याचे सिध्द
झाले आहे. परंतु आज स्त्रि सक्षमरित्या नेतृत्व करण्यास पुरुष प्रधान संस्कृती आड येताना दिसते. तेव्हा समाज बांधवानी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनात बदल करावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट काम करणाºया महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नवीन महिला मतदार तसेच तत्संबधी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार सोहळा गुरूवारी आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे, खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, नायब तहसिलदार चडगुलवार उपस्थित होते.
पुढे बोलताना भांडेकर म्हणाल्या की, संसार रथ दोन चाकाशिवाय चालू शकत नाही, म्हणजेच दुसरा चाक ही स्त्रि असते याची जाणीव ठेवून पुरुषाचे प्रमुख कर्तव्य आहे की, तिचा सन्मान राखावा म्हणजे ती संपूर्णत: सक्षम होईल. तिचे कार्यक्षेत्र बळकट व यशस्वी होण्यासाठी तिच्या नेतृत्वात कुटूंबातील सदस्यांनी अडचण निर्माण करु नये, असेही आवाहन केले.
अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी म्हणाले की, महिला नेतृत्व गुणात कमी नसून ती घरात तसेच कार्यालयात सल्लागाराची प्रमुख भुमिका साकारीत असते. तिच्यात आत्मविश्वास मुळातच भरपूर असतो, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात डगमगत नाही. पुरुष प्रधान संस्कृतीतही स्त्री आपली प्रगती वेगाने करीत आहे. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या सायली तावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर कुबडे यांनी केले तर आभार शीतल नवले यांनी मानले. कार्यक्रमाला महिला व पुरुष कर्मचारी हजर होते.
यांचा झाला गौरव
याप्रसंगी जिल्हा स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला. यामध्ये रेशमा आर. शेंडे, ललीता मेश्राम, कविता नायडु, शुभांगी सहारे यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यामध्ये सायली तावरे, शीतल नवले यांचा समावेश आहे. नितेश सोनवाने यांचा उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहा नवीन महिला मतदारांना निवडणूक ओळखपत्र देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये ताजश्री खेवले, भाग्यश्री येरमे, प्रियंका मंगर, प्रियंका बोदलकर, सरिता निरगुळवार,शितल गावतुरे यांचा समावेश आहे.