आरोग्य केंद्रात राहणे सक्तीचे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:12 AM2021-02-28T05:12:44+5:302021-02-28T05:12:44+5:30
क्लस्टर योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष गडचिरोली : जिल्ह्यातील काही गावांची निवड करून तेथील गावकऱ्यांना शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या ...
क्लस्टर योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष
गडचिरोली : जिल्ह्यातील काही गावांची निवड करून तेथील गावकऱ्यांना शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या उद्देशाने महसूल व कृषी विभागाने मिळून क्लस्टर योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. क्लसर योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
सिराेंचा: जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी युवकांकडून होत आहे.
भंगार प्रवासी वाहनांमुळे अपघात वाढले
गडचिराेली: गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोली तालुक्यासह जिल्ह्यातील दुर्गम भागात भंगार अवस्थेतील काळीपिवळी टॅक्सी विविध मार्गावर वाहतूक करीत आहेत. या भंगार वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने या वाहनांवर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.
योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी हाेत आहे.
गडचिरोली-पेंढरी मार्गावर बसफेऱ्या अत्यल्प
धानोरा : गडचिरोली आगारातून पेंढरी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोलीवरून एटापल्ली-अहेरीकडे जाण्यासाठी गडचिरोली-कारवाफा-पेंढरी हा प्रमुख मार्ग आहे.
अतिक्रमणाने अहेरीत वाहतुकीची कोंडी
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वनोपजावर आधारित उद्योग उभारा
कमलापूर: जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. राळ, डिंक, मोहफूल, हिरडा, बेहडा व आवळा आदी वनोपजावर आधारित उद्योग उभारावेत, अशी मागणी दुर्गम भागात राहणा-या नागरिकांकडून होत आहे. वनोपजावर आधारित उद्योग नसल्याने नागरिकांना बाहेर वनोपज विकावे लागत आहे. त्यामुळे वनोपजावर आधारित उद्योग निर्माण करावा, अशी मागणी आहे.