नोकरी देणारा जिल्हा निर्माण करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:16 AM2017-10-05T01:16:13+5:302017-10-05T01:16:25+5:30
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ निर्मितीच्या पाठपुराव्यादरम्यान माझ्या मनात विविध कल्पना होत्या. सदर विद्यापीठ निर्मितीमागे विविध महत्त्वपूर्ण उद्दिष्टही होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ निर्मितीच्या पाठपुराव्यादरम्यान माझ्या मनात विविध कल्पना होत्या. सदर विद्यापीठ निर्मितीमागे विविध महत्त्वपूर्ण उद्दिष्टही होते. आता विद्यापीठ होऊन सहा वर्षांचा कालवधी उलटला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून हा जिल्हा खनिज संपत्ती, लोककला व इतर वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे विद्यापीठ होऊ नये, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती उपयुक्त ठरण्यासाठी या विद्यापीठामार्फत पर्यावरणपूरक विविध अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे शेकडो हात निर्माण झाले पाहिजे, असा आशावाद राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
गोंडवाना विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी विविध पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, नगराध्यक्ष योगीता पिपरे, विद्यापीठाचे कुलसचिव दिपक जुनघरे, डॉ. ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आता ज्ञान साधनेची व्याख्या बदलावी लागणार आहे. स्मार्ट फोनच्या सहाय्याने जगातील सर्व माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पुस्तकांची फारशी गरज नाही. अर्थातच ज्ञानसाधने उपलब्ध आहेत. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानभंडारही आहे. केवळ कल्पकतेची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनेला व संशोधन वृत्तीला चालणा देण्याचे काम या विद्यापीठामार्फत झाले पाहिजे. तेव्हाच येथील विद्यार्थी स्वावलंबी व सर्वदृष्ट्या सक्षम होईल, असेही नामदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
विद्यापीठाला २०० एकर जमिनीची गरज आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. विद्यापीठ प्रशासनाने इमारतीचा नकाशा द्यावा, शिवाय प्रशासनाने फाईल्सचा पाठपुरावा करावा. नामदार विनोद तावडे यांच्यासोबत मी सुध्दा पूर्ण ताकदनिशी विद्यापीठाला जमीन व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबध्द आहो, असेही अभिवचन नामदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
पर्यावरणयुक्त विद्यापीठाचा जिल्हा म्हणजे, गडचिरोली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या मानांकनात विद्यापीठ अग्रेसर राहिल. दुसºयाला मदतीचा हात देणारे विद्यार्थी या विद्यापीठातून घडले पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त शिक्षण देणारे, माणुसकी देणारे व स्वावलंबनाचे धडे देऊन स्वयंरोजगाराची कास धरणारे देशातील उत्तम विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठ ठरावे, असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सत्कारमूर्ती समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार कुलसचिव दीपक जुनघरे यांनी मानले.
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष, संस्थेचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
अभाविपने शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ना. तावडे यांना काळे झेंडे दाखवत विविध घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी अभाविपच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. मागील तीन वर्षांपासून शिक्षणमंत्र्यांनी विद्यापीठाच्या निवडणुका लोकशाही पध्दतीने होणार असल्याचा गाजावाजा केला. केवळ थापा मारून विद्यार्थ्यांचे नेतृत्व होणार नाही तर काही कामेसुध्दा शिक्षण विषयावर आणि तरूणांच्या नेतृत्वावर शिक्षणमंत्र्यांनी करायला हवे, हे जमत नसेल तर शिक्षणमंत्र्यांनी खुर्ची खाली करावी, अशा प्रकारच्या घोषणा अभाविपने दिल्या. जिल्हा संयोजक हर्षल गेडाम, नगरमंत्री साहिल धाईत यांच्या नेतृत्वात ना. तावडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. पाच प्रमुख कार्यकत्र्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये हर्षल गेडाम, साहिल धाईत, न्युटन मंडल, नगर संघटनमंत्री तेजस मेहरकुरे, सुरज काटवे यांचा समावेश आहे. आंदोलनात चेतन कोडवते, चिराग नंदेश्वर, गोपाल देशमुख अतुल मडावी, योगेश ताराम सहभागी झाले होते.