मराठीला ज्ञान व व्यवहाराची भाषा करा
By admin | Published: February 28, 2016 01:29 AM2016-02-28T01:29:23+5:302016-02-28T01:29:23+5:30
मातृभाषा मराठीला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबरच या भाषेला चिरकाल आयुष्य प्राप्त करून देण्यासाठी ही भाषा ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे.
नरेंद्र आरेकर यांचे प्रतिपादन : गडचिरोली व अहेरी राज्य परिवहन महामंडळ आगारात कार्यक्रम
गडचिरोली : मातृभाषा मराठीला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबरच या भाषेला चिरकाल आयुष्य प्राप्त करून देण्यासाठी ही भाषा ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेला गौरवशाली इतिहास असतानाही या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही. मराठी ही आपली मातृभाषा असल्याने ती बोलण्यात अजिबात कमीपणा वाटू नये, असे प्रतिपादन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.
स्थानिक गडचिरोली बस आगारात मराठी भाषा दिनानिमित्त कुसूमाग्रज यांच्या कवितेच्या फलकाचे अनावरण प्रा. नरेंद्र आरेकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे, आगार प्रमुख व्ही. एन. बावणे, उपयंत्रअभियंता खुडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन अरूण पेंदाम यांनी केले. यशस्वीतेसाठी आस्थापना अधिकारी जे. आर. तनागुलवार, बसस्थानक प्रमुख पवन वासमवार, वाहतूक निरिक्षक बंडू तिलगामे, किशोर लिंगमवार, वाहतूक नियंत्रक एल. बी. चौधरी, सहायक वाहतूक नियंत्रक सुभाष राठोड, माधुरी चिताडे, खुराडे, गौलफ, मंगेश कुमरे, भुरसे, तिवारी, ढोले यांनी सहकार्य केले.
अहेरी आगारात मराठी भाषा गौरव दिन फलकाचे अनावरण
अहेरी आगारात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज लिखित कवितेच्या फलकाचे अनावरण डॉ. श्रीराम महाकाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विवेक बेझलवार होते. इतर भाषांच्या अधिक वापराने मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन ती लोप पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मायबोलीला मान व सन्मानाने स्वीकारले पाहिजे. त्याचा प्रचार केला पाहिजे, एसटी विभागाने अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम पुढे नेण्याची जबाबदारी वाहक, चालक व प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यावर तसेच नागरिकावर आहे, असे प्रतिपादन केले. संचालन व आभार व वामन चिप्पावार यांनी केले. यशस्वीतेसाठी आगाराचे वाहक, चालक व तांत्रिक अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्रवासीही उपस्थित होते.