राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:31 AM2018-09-26T01:31:39+5:302018-09-26T01:32:24+5:30
दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहे. या प्रतिभासंपन्न आदिवासी खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहे. या प्रतिभासंपन्न आदिवासी खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीयस्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, गडचिरोली कृउबासचे मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वंदना महले, शाळा समितीचे अध्यक्ष जांबुवंत पेंदाम आदी उपस्थित होते.
डॉ. सचिन ओंबासे यांनी आश्रमशाळेत क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली असून याचा फायदा खेळाडूंनी घ्यावा. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञान व क्रीडागुणांमध्ये भर घालण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जात आहेत, असे प्रास्ताविकेतून सांगितले.
याप्रसंगी गडचिरोली येथील इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुलींनी तसेच रांगी येथील आश्रमशाळेच्या मुला-मुलींनी नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर व अनिल बारसागडे यांनी केले. तर आभार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुरेश पिलारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल सोमनकर, सुधीर शेंडे, धनंजय वाणी, किशोर येळणे, प्रेमिला दहागावकर, व्ही. जी. चाचरकर, प्रमोद वरगंटीवार, सतीश पवार, सुधीर झंझाळ, सुभाष लांडे, अनिल सहारे, विनोद चलाख, एम. जी. मैंद, विनायक क्षीरसागर, पुरूषोत्तम भोयर, संदीप बिसेन, अनिल रामटेके, चंदा कोरचा, योगीता बिसेन व प्रकल्पाचे कर्मचारी व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.