वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना बनवा

By admin | Published: June 18, 2016 12:48 AM2016-06-18T00:48:40+5:302016-06-18T00:48:40+5:30

वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीमधील उत्पन्न दुपटीने वाढण्याच्या दृष्टिकोनातून

Make a special plan for the peasants | वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना बनवा

वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना बनवा

Next

गडचिरोलीत आढावा बैठक : आदिवासी विकास विभागाच्या सचिवांचे अधिकाऱ्यांना निर्देश
गडचिरोली : वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीमधील उत्पन्न दुपटीने वाढण्याच्या दृष्टिकोनातून विशेष योजना बनवून त्याचे प्रस्ताव सादर करा, या योजनेंतर्गत दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ३० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शुक्रवारी त्यांनी गडचिरोली दौरा केला. यात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले आदी उपस्थित होते. पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेतून सादर केलेल्या प्रस्तावाला खास बाब म्हणून मंजुरी दिली जाईल, असे आदिवासी विकास विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी बैठकीत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक वनहक्कांतर्गत ३० हजार ७०० आदिवासी बांधवांना आतापर्यंत ८४ हजार हेक्टर जमीन देण्यात आली. या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे वनपट्टे शेतीयोग्य करून सहाय्य दिल्यास त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकते. कृषी विभागाने वर्षाला १५ हजार शेतकऱ्यांना भूसुधार व इतर तांत्रिक मदत देण्याचे नियोजन करावे, तसा दोन वर्षाचा नियोजित आराखडा सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात ३६३ ग्रा.पं.ना १६ कोटी ८४ लक्ष रूपयांचा निधी मिळाला आहे. या निधीचा योग्य विनियोग करावा, असेही ते यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)

अंगणवाडी व आश्रमशाळांना भाज्यांची बीज पुरविणार
ग्रा.पं.ना थेट मिळालेल्या निधी हा ग्रामपंचायतींना दीर्घ काळ लाभ होईल, अशा कामांवर खर्च होईल, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. ग्रा.पं. अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये चालू असलेल्या अमृत आहार योजनेंतर्गत पूरक आहार पुरविण्यासाठी हा निधी खर्च केला जाऊ शकतो. तसेच गावात हॅचरिज सारख्या उद्योगावर खर्च करणे शक्य आहे. जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्या व आश्रमशाळांमध्ये जागा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी भाजीपाला लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून पाच प्रकारच्या भाज्यांची बीजे पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी बैठकीत दिली.

अमृत आहार योजनेच्या लाभात खंड पडू देऊ नका
ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी मंजूर तरतुदीच्या ८० टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी थेट अंगणवाड्यांच्या बँक खात्यात देण्यात यावा, असे निर्देश देत सदर योजना एक दिवसही बंद पडणार नाही, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सक्त आदेश सचिव रामगोपाल देवरा यांनी बैठकीत दिले.
अमृत आहार योजनेचे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये शेगड्या उपलब्ध आहेत. अंगणवाड्यांनी शिधापत्रिका तत्काळ बनवाव्यात, या अंगणवाड्यांना हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे दोन सिलिंडर गॅस कनेक्शन देण्यात येत आहे. गहू व तांदूळ बाजारातून खरेदी न करता सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीतून ते देण्यात येणार आहे, असेही देवरा म्हणाले.

Web Title: Make a special plan for the peasants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.