पीक कापणी प्रयोग अचूक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:13 PM2018-07-23T22:13:11+5:302018-07-23T22:13:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पीक कापणी प्रयोगानंतर प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाची आकडेवारी अचूक व विहित वेळेत प्राप्त होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या निर्देशानुसार पीक विमा योजनेच्या अनुषंगाने करावयाच्या पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. याप्रसंगी जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील पिकांचे विविध नैैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगान्वये प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाच्या माहितीचा वापर होतो. त्याकरिता पीक कापणी प्रयोग महसूल, जि. प. कृषी विभागाने अचूकपणे करावा, अशा सूचना प्रशिक्षणार्थींना दिल्या.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशो चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी उपसंचालक धनश्री जाधव यांच्यासह जिल्ह्यातील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पीक कापणी प्रयोगाबाबत विचार व्यक्त करून या प्रयोगाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगाचे नियोजन व तांत्रिक प्रशिक्षण तंत्र अधिकारी (सांख्यिकी) सचिन देवरे यांनी केले. प्रशिक्षणाचे आभार तंत्र अधिकारी सचिन देवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
गावस्तरीय समित्यांना मिळणार प्रशिक्षण
पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून अचूक पीक उत्पादनाची सरासरी व नुकसान माहिती व्हावे, यादृष्टीने पीक कापणी प्रयोगाच्या गावस्तरीय समितीचे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करावे तसेच गावस्तरीय समिती सदस्यांना पिकाच्या कापणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत क्षेत्रीय कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या.