सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:25 AM2018-07-18T00:25:36+5:302018-07-18T00:27:19+5:30

Make the water pump available to farmers with irrigation facility! | सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपूर येथील विधानभवन सभागृहात घेतला जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य सचिव डी. के. जैन, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १० जुलै अखेर ३ हजार ६६५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तीन वर्षात १० हजार ८१७ कामे पूर्ण झाली. १८१ मालगुजारी तलाव दुरूस्त झाले. ३ हजार १३८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्यासाठी २९ अभियंते नियुक्त केले आहेत. गडचिरोली रेल्वे मार्गासाठी खासगी जमीन संपादीत करण्याचे काम वन विभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबविण्याच्या सूचना रेल्वेतर्फे दिल्या होत्या. वन विभागाची परवानगी येत्या आठ दिवसात मिळाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरूवात होईल, अशी माहिती वने व पालकसचिव विकास खारगे यांनी दिली.
सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाच्या वाहतुकीचे काम स्थानिकांना मिळेल, यादृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी बैठकीदरम्यान सादर केले.
१६ गावे सौरऊर्जेने प्रकाशली
सौरऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दुर्गम भागातील ४९ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी १६ गावे सौरऊर्जेने प्रकाशली आहेत. चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाचे नुकसान टाळण्यासाठी २२ गोदामे बांधली जाणार आहेत.

Web Title: Make the water pump available to farmers with irrigation facility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.