मालदुगीला वनहक्क प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:24 AM2018-03-21T01:24:45+5:302018-03-21T01:24:45+5:30
मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ठ कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील ग्रामस्थांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीवर सामुहिक वनहक्काचे शासनाचे पत्र तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ठ कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील ग्रामस्थांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीवर सामुहिक वनहक्काचे शासनाचे पत्र तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. त्यामुळे मालदुगी येथील ग्रामसभा सदस्य ३२५ हेक्टर वनजमिनीचे मालक बनले आहेत.
अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी अधिनियम २००६ व नियम २००८ तथा सुधारणा नियम २०१२ अन्वये मालदुगी येथील ग्रामसभेने गावाच्या हद्दीतील वनजमिनीवर आपल्या जीवनोपयोगी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तसेच कायद्यातील कलम ५ प्रमाणे अन्नसुरक्षेची खात्री करण्याबरोबरच वनांचा शाश्वत वापर करणे, जैवविविधतेचे संवर्धन करुन पर्यावरणाचा समतोल राखणे, सामुहिक वनसंपत्तीच्या प्रवेशाचे नियमन करण्याकरिता तसेच वन्यजीव, वने व जैवविविधता यांच्यावर प्रतिकुल परिणाम करणारी कोणतेही कामे थांबवण्याकरिता गावातीलच वनहक्क समितीकडे ३२५ हेक्टरच्या वनजमिनीवर सामुहिक वनहक्क दावा दाखल केला. वनहक्क समितीने सदर दाव्याची पडताळणी करुन ग्रामसभेत दावा मंजूर केला व उच्च स्तरीय समितीकडे कार्यवाहीसाठी पाठवला.
२००७ पासून गावकरी वनहक्कासाठी संघर्ष करत होते. २०११ साली सार्वजनिक वनहक्क दावा वैयक्तिक नावाने मंजूर झाल्याने अडचण निर्माण झाली. सदर दावा रद्द करुन सुधारित वनहक्क दावा मिळावा यासाठी मालदुगी येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी पाठपुरावा केला. सदर सुधारित नमुन्यातील वनहक्क जिल्हास्तरीय वनहक्क समितीने २६ डिसेंबर २०१७ रोजी निर्गमित करुन ‘ग्रामसभा मालदुगी’ या नावाने मंजूर केला. तहसीलदार चरडे यांच्या हस्ते सामुहिक वनहक्काबाबतचे शासनाचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी मालदुगी ग्राम पंचायतीचे सरपंच यशवंत चौरीकर, उपसरपंच शितल मडावी, वनहक्क समितीचे अध्यक्ष श्रीराम गुरनूले, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन राऊत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम नैताम, ग्रा.पं.सदस्य अन्नाजी नैताम, गुलाब औरासे, सुरेखा सहारे, दर्शना राऊत, मिराबाई कोडापे, तलाठी किरंगे, वनरक्षक गोठा, ग्रामकोष समितीचे अरुण कुथे, गुरुदेव सेवा मंडळाचे तानाजी तिरपुडे, दमयंती चौरीकर, बाबुराव गाथे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक वनहक्काबाबत नायब तहसिलदार मडावी यांनी मार्गदर्शन केले. ११ वर्षाच्या संघर्षानंतर वनहक्क मिळाल्याने गावकरी आनंद व्यक्त करित आहे.
मालदुगी येथील मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अविनाश पोईणकर यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.