मलेरिया नियंत्रणात

By admin | Published: November 6, 2016 01:27 AM2016-11-06T01:27:34+5:302016-11-06T01:27:34+5:30

आरोग्य विभागाने केलेल्या विविध उपाययोजना व वातावरणाची साथ मिळाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत

Malaria control | मलेरिया नियंत्रणात

मलेरिया नियंत्रणात

Next

मागील वर्षीच्या तुलनेत : पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड घटली
गडचिरोली : आरोग्य विभागाने केलेल्या विविध उपाययोजना व वातावरणाची साथ मिळाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरिया नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडे असलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. या जिल्ह्यात पर्जन्यमानही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. धानाची शेती केली जाते. धानाच्या बांधीत रोवणीपासून ते धान कापणीपर्यंत पाणी साचून राहते. धानाच्या बांध्या गावाच्या सभोवताल असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात मलेरिया रोगाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी कोरची, एटापल्ली, धानोरा या तालुक्यांमध्ये मलेरियाचा उद्रेक झाला होता.
जानेवारी ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत सुमारे ७ नागरिकांचा बळी गेला होता. आरोग्य विभागाने जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत जिल्हाभरातील ५ लाख ८ हजार ९६७ नागरिकांचे रक्त नमूने घेतले होते. त्यापैकी २० हजार १३५ नमूने पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. २०१५ मधील सप्टेंबर महिन्यात ८८ हजार ४८४ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ३७८ नागरिकांचे रक्त नमूने पॉझिटीव्ह आढळून आले होते.
मागील वर्षी मलेरिया रोगाचा बसलेला फटका लक्षात घेऊन आरोग्य विभाग या वर्षी जागृत झाला होता. मागील वर्षी प्रमाणे मलेरियाचा उद्रेक होऊ नये, यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा पावसाळ्यापूर्वीच कामाला लागली. आवश्यक त्या पूर्व उपाययोजना सुद्धा या यंत्रणेच्या मार्फतीने करण्यात आल्या. जानेवारी ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत सुमारे ७ लाख ४ हजार ९३७ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले. त्यापैकी केवळ ६ हजार ६१७ नागरिकांचे रक्त नमूने पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. तर या कालावधीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०१६ या एका महिन्यात ९४ हजार ३६ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले. त्यापैकी ३२९ नागरिकांचे रक्त नमूने पॉझिटीव्ह आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत मलेरियाग्रस्त नागरिकांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणे मलेरिया रोगावर नियंत्रण मिळविण्यास गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला अजूनपर्यंत यश प्राप्त झाले नाही. मलेरिया रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जोपर्यंत नागरिक स्वत:हून मलेरियापासून बचावासाठी उपाययोजना करणार नाही, तोपर्यंत आरोग्य विभागाचे प्रयत्न थिटे पडणार आहेत. (नगर प्रतिनिधी)

मागील वर्षीच्या तुलनेत रक्त नमुने वाढले
जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत जिल्हाभरातील ५ लाख ८ हजार नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले होते. २०१६ मध्ये मात्र ७ लाख ४ हजार ९३७ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत नमून्यांची संख्या अधिक असली तरी त्या तुलनेत मलेरिया पॉझिटीव्ह आढळणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून येते. रुग्णांची संख्या कमी झाल्याने मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या पावसाळ्यात मलेरियाने ग्रस्त रुग्णांची संख्या सुद्धा कमी आढळून आली.

दरवर्षी मलेरियाचा होणारा उद्रेक लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ लावून सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमूने तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यात आला. मलेरियाचे त्वरित निदान करून उपचार करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाला. त्यामुळे दमट वातावरण निर्माण झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेचे कार्य व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरियाग्रस्त रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे.
- शिवशंकर पांडे, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली

Web Title: Malaria control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.