मुंबई-पुण्यातही पाेहाेचला मालदुगीच्या मधाचा गाेडवा; महिला उत्पादक गटाने घेतली ‘भरारी’
By गेापाल लाजुरकर | Published: April 20, 2023 03:41 PM2023-04-20T15:41:03+5:302023-04-20T15:43:47+5:30
भरारी महिला उत्पादक गटाने मध संकलन करून खरेदी- विक्री या व्यवसायाची सुरुवात केली
गडचिराेली : जिद्द, चिकाटी व श्रमाच्या बळावर पुरुषच नव्हे, तर महिलासुद्धा उद्याेग व व्यवसायात भरारी घेऊ शकतात. त्या यशस्वी हाेऊ शकतात. हे दाखवून दिले आहे. कुरखेडा तालुक्यातील मालदुगी गावच्या महिलांनी.
उमेदअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या उडाण महिला ग्रामसंघाने तयार केलेले शुद्ध मध मुंबई- पुणे यासारख्या माेठ्या शहरांमध्ये विक्रीच्या माध्यमातून पाेहाेचला असून, मालदुगीच्या मधाचा गाेडवा आता माेठ्या शहरातील लाेकांमध्येही दिसून येत आहे.
कुरखेडा तालुका मुख्यालयापासून पश्चिमेस ८ किमी अंतरावर मालदुगी हे गाव आहे. तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प यांच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्यातील मालदुगी या गावाचा समावेश एनआरईटीपीमध्ये करण्यात आला आहे. मालदुगी या गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून भरारी महिला उत्पादक गटाची स्थापना १७ सप्टेंबर २०१९ मध्ये गावातील १९ महिलांनी एकत्र येऊन केली. सदर उत्पादक गटामध्ये शेतकरी कुटुंबांतील महिलांचा समावेश आहे. या उत्पादक गटातील सर्व महिला या बचत गटातील सदस्य आहेत.
मालदुगी हे गाव जंगलात वसलेले आहे. यामुळे या गावात गौणवनोपजाचे संकलन मोठ्या प्रमाणात होते. गावातील परिसराचा अभ्यास करून भरारी महिला उत्पादक गटाने मध संकलन करून त्याला फिल्टर व प्रोसेसिंग करून लेबलिंग, पॅकेजिंग करून मधाची विक्री करण्याचे ठरविले. यासंदर्भातील ठराव त्यांनी मासिक सभेत घेतला.
ग्रामसंघाच्या अध्यक्ष आरती उईके, सचिव तिलोत्तमा मुंगमोडे यांच्या पुढाकाराने भरारी महिला उत्पादक मध खरेदी- विक्री या व्यवसायाची निवड करून त्यांनी सदर व्यवसायासाठी आवश्यक असलेला निधी मिळविण्यासाठी उत्पादक गटाचा प्रस्ताव तयार करून गडचिराेली येथील जिल्हा अभियान व्यवस्थापन कार्यालयास पाठविला. त्यानुसार त्यांना निधी प्राप्त झाला.
कशी केली सुरुवात?
महाराष्ट्र राज्य ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून व्यवसाय निधी देण्यात आला. कार्यालयीन सेटअपसाठी ५० हजार रुपये, तसेच व्यवसायासाठी १ लाख ५० हजार रुपये, असा एकूण २ लाख रुपयांचा निधी भरारी महिला उत्पादक गटास प्राप्त झाला. भरारी महिला उत्पादक गटाने मध संकलन करून खरेदी- विक्री या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांनी व्यवसायासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली.
स्वत:चा ब्रॅण्ड तयार केला
भरारी महिला उत्पादक गटाने आपल्या व्यवसायात १ लाख ६७ हजार ८९५ रुपये गुंतविले. त्याची उलाढाल २ लाख २१ हजार ४५८ रुपये एवढी झाली. यात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत नफा प्राप्त झाला. या व्यवसायात त्यांनी आपल्या उत्पादक गटाच्या नावे लेबल, पाॅकीट, ब्रॅण्ड तयार करून विक्री करीत आहेत.
वर्षभरात सव्वालाखाचा नफा
भरारी महिला उत्पादक गटाला या वर्षात भरारी उत्पादक गटाने १ किलो मध ३०० रुपये या दराने खरेदी करून ३५० रुपये किलो दराने विक्री केले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढली. आजपर्यंत ५ लाख ५१ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली आहे. यात १ लाख १८ हजार ६०० रुपये नफा प्राप्त झाला. विशेष म्हणजे, सदर उत्पादक गटाला तालुका व्यवस्थापन कक्ष कुरखेडा येथील सर्व कर्मचारी वेळोवेळी दर महिन्याला मासिक सभेत योग्य मार्गदर्शन करतात.