घरासाठी ‘छप्पर’ आणायला गेला; पण विद्युतने घात केला !
By गेापाल लाजुरकर | Published: March 17, 2024 07:26 PM2024-03-17T19:26:50+5:302024-03-17T19:26:57+5:30
ताडाची फांदी ताेडताना करंट लागून युवकाचा मृत्यू
गडचिराेली : घरावर छतावर ‘छप्पर’ म्हणून पसरवण्यासाठी ताडाच्या झाडाच्या फांद्या आणण्यासाठी गेलेल्या युवकाला झाडावरच विद्युत करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अहेरी तालुक्याच्या शिवणीपाठ येथील एका शेतात शनिवार १६ मार्च राेजी सकाळच्या सुमारास घडली.
अमोल मनोहर ठाकरे (३०) रा. शिवणीपाठ असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अमाेल हा घराच्या छतावर ताडाच्या पसरट फांद्या टाकण्याकरिता त्या फांद्या आणण्यासाठी आपल्या वडिलांसोबत गावालगतच्या शंकर तलांडे यांच्या शेतात सकाळी ८ वाजेच्या दरम्यान गेला. ताे ताडाच्या झाडावर चढून ताडाच्या एकेक फांद्या ताेडत हाेता.
याच परिसरातून ११ केव्ही विद्युत लाइन गेली आहे. दरम्यान ताडाची एक फांदी विद्युत तारांवर पडली. फांदीचे एक टाेक तारांवर व मूळ टाेक झाडाला लागूनच हाेते. त्यामुळे झाडात वीज प्रवाहित झाली अन् अमाेल हा क्षणात जमिनीवर कोसळला. वडिलांनी आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले आणि त्याला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; परंतु डाॅक्टरांनी तपासणी करून अमाेलला मृत घाेषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ आहे.