नाल्यात युवक गेला वाहून, पुलाअभावी करावा लागतो धोकादायक प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 03:47 PM2018-07-12T15:47:08+5:302018-07-12T15:58:17+5:30
पुलाअभावी करावा लागतो धोकादायक प्रवास
जिमलगट्टा (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा मार्गावरील किष्टापूर नाला पार करण्याच्या प्रयत्नात एक युवक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (11 जुलै) सायंकाळी ही घटना घडली. मात्र तरुणाचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
नागेश मलय्या कावरे असे या युवकाचे नाव आहे. कोत्तागुडम येथील रहिवासी असलेला नागेश व त्याचा भाऊ लखनगुडा येथील आपल्या शेतात नांगरणीचे काम आटोपून घरी परत येत होते. नेहमीप्रमाणे ते किष्टापूर नाला पार करून पैलतिरावर जाण्यासाठी निघाले. मात्र पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने नागेश प्रवाहासोबत वाहत गेला. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.
गावातील नागरिकांनी गुरूवारी (12 जुलै) सकाळपासून नाल्याच्या परिसरात शोधाशोध सुरू केली, मात्र दुपारपर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. या नाल्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहातूनच नाला पार करावा लागतो. नक्षल्यांच्या दहशतीमुळे कोणीच कंत्राटदार रस्ता किंवा पुलाचे काम करण्यासाठी तयार होत नाही. यावर्षी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधकामासाठी निविदा काढली आहे.