सहसचिवाच्या नावे बनावट बदली आदेश पाठविणारा पोलिस पती जेरबंद
By संजय तिपाले | Published: June 5, 2023 05:27 PM2023-06-05T17:27:25+5:302023-06-05T17:28:30+5:30
पत्नीच्या बदलीसाठी काहीपण... ब्रम्हपुरीतून एसपींना ई- मेल पाठविल्याचे उघड
गडचिरोली : राज्याच्या गृहविभागाच्या सहसचिवांच्या नावे पोलिस अधीक्षकांना ई- मेलद्वारे दोन अंमलदारांच्या बदल्यांचे बनावट आदेश दिल्याचे धक्कादायक प्रकरण महिनाभरापूर्वी घडले होते. याचाउलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून हा बदली आदेश एका महिला अंमलदाराच्या पतीनेच केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेने त्यास जेरबंद केले असून तो सध्या कोठडीत आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता.यात पोलिस मदत केंद्र धोंडीराज (जि.गडचिरोली) येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलिस अधीक्षक कार्यालय, नक्षल सेल व पोलिस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता. त्याखाली सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव व स्वाक्षरी होती.
गृहविभागाच्या नियमित ई- मेलवरुन हा मेल आला नव्हता. शिवाय अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागातून निघत नाहीत. त्यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. त्यांनी सायबर विभागाकडे चौकशी सोपवली. उपनिरीक्षक सागर आव्हाड यांनी गृहविभागात जाऊन चौकशी केली असता हा मेल त्यांनी पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरुन गडचिरोली ठाण्यात फसवणूक व माहिती - तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला, त्यानंतर गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी तपासचक्रे गतिमान केली.
मुंबईचा पत्ता, ई- मेल पाठविला ब्रम्हपुरीतून
पोलिस निरीक्षक उल्हास भुसार यांनी तांत्रिक तपास केला असता ई- मेल मुंबईवरुन नव्हे तर ब्रम्हपुरी (जि.चंद्रपूर) येथील एका नेट कॅफेवरुन आल्याचे उघड झाले. त्यानुसार, चौकशी केली असता हा ई- मेल पोलिस अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांचा पती संदीप मड्डेलवार (रा.वनश्री कॉलनी, गडचिरोली) याने पाठविल्याचे समोर आले. त्यास २ जून रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आढेवेढे घेतले, पण खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दोन अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश थेट गृहमंत्रालयातून प्राप्त झाले, तेव्हाच या मेलबाबत शंका आली, त्यानंतर हा मेल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर गुन्हा नोंदवून तपास केला. एका महिला अंमलदाराच्या पतीला अटक केली आहे. यात महिला अंमलदाराचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक