जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे निम्मे शरीर वाघाने केले फस्त; दुसऱ्या दिवशी लागला शाेध

By गेापाल लाजुरकर | Published: November 9, 2022 06:00 PM2022-11-09T18:00:29+5:302022-11-09T18:03:34+5:30

चामाेर्शी तालुक्याच्या भाडभिडी माेकासातील घटना

man killed in a tiger while feeding the bulls in the forest, body found on second day | जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे निम्मे शरीर वाघाने केले फस्त; दुसऱ्या दिवशी लागला शाेध

जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे निम्मे शरीर वाघाने केले फस्त; दुसऱ्या दिवशी लागला शाेध

Next

चामोर्शी (गडचिराेली) : स्वमालकीची गुरे गावालगतच्या जंगलात चराईसाठी नेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याचे निम्मे शरीर फस्त केले. ही घटना चामाेर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रांतर्गत मुरमुरी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ४ मध्ये बुधवार ९ नाेव्हेंबर राेजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.

दशरथ उंदरू कुनघाडकर (६०) रा. भाडभिडी माेकासा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. दशरथ कुनघाडकर हे स्वमालकीची गुरे चराईसाठी मुरमुरी जंगलातील कंपार्टमेंट नं. ४ मध्ये मंगळवार ८ नाेव्हेंबर राेजी सकाळी ११ वाजता घेऊन गेले. नेहमीप्रमाणे ते याच परिसरात गुरे चारत हाेते. गुरे चारत असताना वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले.

घटनेनंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास केवळ त्यांचे बैल जंगलातून परत आले. मात्र कुनघाडकर हे परत आले नाही. काही वेळाने तरी ते परत येतील, अशी आशा बाळगून कुटुंबीय त्यांची प्रतीक्षा करीत हाेते; परंतु अंधार पडूनही ते परतले नाही. तसेच याच वेळी संदीप डोमाजी गव्हारे यांची गाय जंगलातून परतली नाही. तेव्हा गावातीलच ग्रा.पं. सदस्य विकेश नैताम, भाऊराव नैताम, सुधाकर कुनघाडकर, श्यामराव कुनघाडकर व इतरांनी मिळून जंगलाच्या दिशेने रात्री ११ वाजतापर्यंत शोध घेतला; पण शोध लागला नाही.  शेवटी ते सर्वजण घरी परतले.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून गावातील लोकांना सोबत घेऊन नातेवाईकांनी शेतशिवारात शोध घेत असता सकाळी १० वाजताच्या सुमारास सुरूवातीला एक गाय मृतावस्थेत आढळली. त्यानंतर त्याच परिसरात एक अर्धवट खाल्लेले प्रेत आढळले. जवळ जाऊन पाहणी केली असता प्रेताचा चेहरा व फाटलेले कपडे यावरून ओळख पटली.

अर्धवट खाल्लेले शरीर दशरथ कुनघाडकर यांचेच असल्याची खात्री कुटुंबीयांना झाली. त्यानंतर घटनेची माहिती वनविभाग व चामोर्शी पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, राजकुमार चिंचोलकर, गणेश बैस, तसेच वनपिरिक्षेत्राधिकरी राहुल तांबरे, जोगना उपक्षेत्राचे क्षेत्र सहायक धाईत, कुनघाडा उपक्षेत्राचे क्षेत्रसहाय एस. एम. मडावी, वनरक्षक एन. बी. गोटा आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

तालुक्यातील पहिली घटना; ट्रॅप कॅमेरे लावले

भाडभिडी माेकासा गावाच्या जंगल परिसरात वाघाने दशरथ कुनघाडकर यांना ठार केल्यानंतर वन विभागाने लगेच दुसऱ्या दिवशी घटना परिसरात चार ट्रॅप कॅमेरे लावले. चामाेर्शी तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. ट्रॅप कॅमेरे हे वाघाची ओळख व हालचाल टिपणार आहेत. विशेष म्हणजे, व्याघ्र जनजागृती पथकाला सक्रिय केले असून नागरिकांना सदर जंगल परिसरात जाण्यासाठी मज्जाव केला असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: man killed in a tiger while feeding the bulls in the forest, body found on second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.