कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच महिला व युवतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सवादरम्यान मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:20 PM2024-08-27T15:20:24+5:302024-08-27T15:21:19+5:30

Gadchiroli : एसडीपीओंचे आवाहन, गडचिरोलीत शांतता बैठकीचे आयोजन

Mandals are requested to install CCTV during Ganeshotsav to ensure that no untoward incident takes place and for the safety of women and girls | कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच महिला व युवतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सवादरम्यान मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन

Mandals are requested to install CCTV during Ganeshotsav to ensure that no untoward incident takes place and for the safety of women and girls

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असून दहा दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शांततापूर्ण वातावरणात नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा, देखावा बघण्यासाठी गर्दी उसळत असेल तर अशा मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरासह तालुक्यातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलिस पाटील यांची शांतता बैठक चंद्रपूर मार्गावरील पटेल मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप म्हणाले, गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना शासनाने तसेच पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, गणेशोत्सवापूर्वी नगर परिषद, पोलिस ठाणे तसेच तहसील प्रशासनाची विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. गणेश मंडळ परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच महिला व युवतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह सुरक्षेसंबंधित विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखवू नये, जबरदस्ती नागरिकांकडून वर्गणी गोळा करू नये, आकर्षक देखावे बघण्यासाठी आलेल्या महिला व युवतींच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणे, गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट टाकू नये, तसेच वेळोवेळी पोलिस प्रशासनाद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. एकंदरीत दहा दिवस पार पडणारा गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार उपस्थित होते. 


शांतता बैठकीदरम्यान ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले की, गणेशोत्सव सर्वच जाती, धर्माचे नागरिक उत्साहात साजरा करतात. या उत्सवादरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.


गणेश मंडळ परिसरात स्वच्छता बाळगावी : भंडारवार 
नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी मार्गदर्शन केले. शहरातील मुख्य तलावात विसर्जनादरम्यान स्वच्छता बाळगण्यासह वीज व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाप्रसाद वितरण कार्यक्रमासंदर्भात माहिती नगर परिषद प्रशासनाला दिल्यास कार्यक्रमस्थळी घंटागाडी उपलब्ध करून दिली जाईल. शासनाने गणेश मंडळाकरिता स्पर्धेचे आयोजन केले असल्याने शहरातील गणेश मंडळांनी यात सहभागी व्हावे, गणेश मूर्ती खरेदीकरिता आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून देण्यात आली असून भाविकांनी पीओपी गणेश मूर्ती घेण्याचे टाळावे, असे आवाहन उपमुख्याधिकारी भंडारवार यांनी यावेळी केले.

Web Title: Mandals are requested to install CCTV during Ganeshotsav to ensure that no untoward incident takes place and for the safety of women and girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.