नक्षल्यांविरोधात जनआक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:44 AM2019-02-10T01:44:27+5:302019-02-10T01:44:42+5:30
मागील पंधवरड्यात नक्षल्यांनी आठ आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भूमकाल रॅली काढून नक्षल्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. दुर्गम भागातही नक्षल्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील पंधवरड्यात नक्षल्यांनी आठ आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भूमकाल रॅली काढून नक्षल्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. दुर्गम भागातही नक्षल्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.
आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे स्वप्न दाखविणाऱ्या नक्षलवाद्यांनी भूमकाल दिनाच्या पर्वावर जिल्ह्यातील ताडगाव परिसरातील कसनासूर येथे सहा आदिवासींना पळवून नेऊन तीन आदिवासींची क्रुरपणे हत्या केली. गावातील नागरिकांच्या घरगुती सामानाची नासधूस करून त्यांना गाव सोडण्यास भाग पाडले, असा आरोप भूमकाल रॅलीतून नागरिकांनी केला. तसेच धोडराजवळील जुव्वी नाला, एटापल्लीतील ताडगुडा, विसामुंडी येथे प्रत्येकी एकाची तर धानोरा तालुक्यातील सावरगाव हद्दीत दोघांची हत्या नक्षल्यांनी केली. तसेच काही भागात आदिवासींना मारहाण केली. जाळपोळ करून मालमत्तेचा नुकसान केले. काही भागात लाल कापडी बॅनर लावून जनतेमध्ये दहशत निर्माण केली, असा आरोप जनआक्रोश रॅलीतून नागरिकांनी केला.
नक्षलवाद्यांच्या या कृतीमुळे दुर्गम भागातील आदिवासींना विकासापासून वंचित ठेवले जात आहे, असा आक्रोश रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त करीत नक्षल्यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. शनिवारी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ५५ ठिकाणी नक्षलविरोधी भूमकाल रॅली काढण्यात आली.
ठिकठिकाणच्या या रॅलीत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले. हातात विविध घोषणांचे फलक हातात घेऊन नक्षल्यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.