कोरोनामुळे अनेकांनी शोधला नवीन रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:31+5:30
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असलेल्या सेवाच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीलाच २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सुमारे २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या कमाईतून रात्री चूल पेटविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे या लॉकडाऊनमुळे मोठे हाल झाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठ सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिक व मजूर वर्ग करीत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये अनेकांचे रोजगार बंद पडले. छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले. या संकटातूनच मार्ग शोधताना अनेकांनी आपला जुना व्यवसाय बदलवून नवीन व्यवसायाला सुरूवात केली असल्याचे चित्र गडचिरोलीसह तालुकास्तरावरील शहरांमध्ये दिसून येत आहे.
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असलेल्या सेवाच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीलाच २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सुमारे २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या कमाईतून रात्री चूल पेटविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे या लॉकडाऊनमुळे मोठे हाल झाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठ सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिक व मजूर वर्ग करीत होता. मात्र पुन्हा केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. सुमारे ४० दिवसांचा रोजगार गेल्यास जगायचे कसे, असा प्रश्न लहान व्यावसायिकांसमोर निर्माण झाला. त्यामुळे या व्यावसायिकांनी स्वत:चा व्यवसाय बदलवून लॉकडाऊनच्या कालावधीतही जो व्यवसाय करणे शक्य आहे, असे व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे.
भाजीपाला विक्री, दुध, ब्रेड, फळे विक्री अजुनही सुरू आहे. स्वत:च्या पारंपारिक व्यवसाय सोडून त्याच ठिकाणी आता दुसरा व्यवसाय सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. नवीन व्यवसाय सुरू केला असला तरी दुकाने सुरू ठेवण्याची मर्यादा केवळ १ वाजेपर्यंत आहे. तसेच कोरोनाच्या भितीमुळे नागरिक फारसे बाहेर निघत नाही. परिणामी नवीन व्यवसायातून फारसे उत्पन्न मिळत नाही. मात्र या नवीन रोजगाराने त्यांच्या घरची चूल पेटविण्यास निश्चितच मदत झाली आहे. लॉकडाऊन कधी हटणार याची प्रतीक्षा जिल्हाभरातील व्यावसायिक करीत आहेत.
जोखीम उचलण्याची प्रेरणा
आजपर्यंत अनेकांनी आपला पारंपारिक व्यवसायच करण्याला प्राधान्य दिले होते. जुन्या व्यवसायातून भलेही कमी कमाई होत असेल मात्र हे व्यावसायिक त्याच व्यवसायाला चिकटून होते. मात्र कोरोनामुळे त्यांना नवीन व्यवसायांचा शोध घेण्यास भाग पाडले. सुरूवातीला नवीन व्यवसाय करताना अडचणी येत होत्या. मात्र नवीन व्यवसायातील बारकावे, त्रुट्या लक्षात आल्यानंतर त्यावर मात करण्याची कुवत दुकानदाराने निर्माण केली आहे. व्यवसाय बदलण्याची जोखीम या दुकानदारांनी उचलली आहे. काही दुकानदारांना नवीन व्यवसायातून जुन्या व्यवसायापेक्षा अधिक नफा मिळत असल्याने त्याच व्यवसायात स्थिरावण्याची शक्यता आहे.
आपला पूर्वी पुजा साहित्य विक्रीचा व्यवसाय होता. मात्र लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर गंडातर आले. कुटुंब चालविण्यासाठी काहीना काही रोजगार करणे आवश्यक आहे. शासनाने ब्रेड, बिस्कीट विक्रीला अत्यावश्यक सेवेत समावेश केले आहे. काळाची गरज ओळखून आपण आता ब्रेड विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यातूनही थोडीफार कमाई होत आहे.
- शब्बीर खान महेबूब पठाण, दुकानदार