१० रूपयातील भोजनाने अनेकजण होतात तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:04 AM2019-05-26T00:04:20+5:302019-05-26T00:04:44+5:30
दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामानाने नाश्ता, जेवण आदीच्या दरातही वाढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून भुकेलेल्यांना माफक दरात अन्न देणारे विरळच. परंतु आलापल्ली येथील जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने मागील एक वर्षापासून १० रूपयांत भुकेलेल्यांना भोजनदान केले जात आहे.
प्रशांत ठेपाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामानाने नाश्ता, जेवण आदीच्या दरातही वाढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून भुकेलेल्यांना माफक दरात अन्न देणारे विरळच. परंतु आलापल्ली येथील जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने मागील एक वर्षापासून १० रूपयांत भुकेलेल्यांना भोजनदान केले जात आहे. या भोजनदानातून येथे येणारे अनेकजण तृप्त होत आहेत.
आलापल्ली येथे अहेरी उपविभागातील नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. त्यादृष्टीने क्रिष्णा भुजेल यांनी एटापल्ली मार्गावरील किरायाच्या घरी मागील दोन वर्षांपासून खानावळ चालवित आहेत. यापूर्वी ते ग्राम पंचायतीच्या बाजूला बिर्याणी सेंटर दोन वर्षांपासून चालवित होते. आलापल्ली येथे येणाऱ्या लोकांचा वाढता ओढा पाहून तसेच गरजूंना अल्पदरात जेवण मिळावे, यादृष्टीने त्यांनी जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून बिर्याणी सेंटरमध्येच गरजूंना १० रूपयांत भोजन देण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे त्यांनी बिर्याणी सेंटर बंद केले. जी व्यक्ती दहा रूपयेसुद्धा देऊ शकत नाही. अशा व्यक्तींसाठी मोफत भोजन देण्याचा विढा त्यांनी उचलला. दररोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भोजनदान केले जात आहे. तसेच उरलेले अन्न सायंकाळी गरजूंना दिले जात आहे.
या कामाची सुरूवात १६ मे २०१८ पासून करण्यात आली. या भोजनालयाचे उद्घाटन ग्रा. पं. तील सफाई कामगाराच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानुसार आत्तापर्यंत दररोज गरीब, गरजूंना दहा रूपयांत भोजनदान करण्याचे काम सुरू आहे. दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूंच्या दरवाढ होत असतानाच लहानापासून मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवणाच्या थाळीची किंमत वाढली आहे.
१० रूपयांत काही ठिकाणी नाश्ता मिळत नाही. परंतु आलापल्ली येथे गरीब व गरजूंचे पोट भरावे म्हणून जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० रूपयांत भोजनदान केले जात आहे.
३५० लोकांना भोजनदान
जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचा स्थापना दिवस १६ मे रोजी आलापल्ली येथे साजरा करण्यात आला. भोजनदानाच्या या उपक्रमाला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या दिवशी सकाळी ११ वाजतापासून ३५० च्या वर लोकांना मोफत भोजनदान करण्यात आले. आबाल वृद्ध, दिव्यांगांनी भोजनाचा आश्वाद घेतला. याप्रसंगी क्रिष्णा भुजेल, महादेव शिंगाडे, मुरली कोमले, आशिष भगत, दत्तू चिकाटे, नाना पस्पुनुरवार, अनिल चांदेकर व कळंबे उपस्थित होते.
गरीब गरजूंसाठी सोईचे
अहेरी उपविभागातून अनेक नागरिक आलापल्ली येथे विविध कामानिमित्त येतात. सकाळी पोहोचल्यानंतर त्यांना चाय, नाश्ता करावा लागतो. यात बराचसा पैसा खर्च होतो. परंतु जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेद्वारे १० रूपयांत भोजनदान केले जात असल्याने बाहेरगावाहून आलेल्या गरीब, गरजूंना सोयीचे झाले आहे. भीक मागून जीवन जगणारे अनेक व्यक्ती येथे भोजन करून आपल्या पोटाची भूक मिटवितात. या सर्वांसाठी हे भोजनालय सोयीचे झाले आहे.