अनेक ठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:18 AM2019-03-13T00:18:11+5:302019-03-13T00:21:57+5:30
मोहफूल आणि तेंदपत्त्याचा हंगाम सुरू होताच जंगलात वणवे भडकण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी पहाटे आलापल्ली आणि वडसा वनविभागांतर्गत अनेक बीटमध्ये आगी लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवसभर वनविभागाची धावपळ सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोहफूल आणि तेंदपत्त्याचा हंगाम सुरू होताच जंगलात वणवे भडकण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी पहाटे आलापल्ली आणि वडसा वनविभागांतर्गत अनेक बीटमध्ये आगी लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवसभर वनविभागाची धावपळ सुरू होती.
जंगलातीलआगीच्या घटनांची माहिती तत्काळ वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी सॅटेलाईट अलर्टचा वापर केला जात आहे. त्यामुळे मध्यरात्री १.४६ च्या सुमारास वणवे लागल्याचा संदेश सॅटेलाईटने दिला. त्यात आलापल्ली वन विभागाअंतर्गत घोट क्षेत्रातील नरेंद्रपूर बीट, ठाकूरनगर बीट, घोट बीट, तसेच वडसा वन विभागातील पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत हडकिनार बीट, देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत मांगदा ब्लॉकमधील कुलकुली बीट, मालेवाडा वनपरिक्षेत्रातील रानवाही बीट आदी भागात एकाच दिवशी आगी लागल्या. त्यामुळे सदर आगी तेंदू हंगामासाठी मुद्दाम लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक वनवक्षकाकडे देण्यात आलेल्या फायर ब्लोअरच्या मदतीने जाळरेषा आखून वणव्यांवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. बऱ्याच प्रमाणात आग आटोक्यात असली तरी काही भागात अजूनही वणवा धुमसत असल्याचे समजते.
जाणीवपूर्वक जंगलातील पालापाचोळ्याला आग लावल्या जाऊ नये यासाठी वनविभागाकडून जनजागृती केली असली तरी त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून येत नाही.
श्वापदांचा जीव धोक्यात
तेंदूपत्ता, मोहफूल संकलन करणाऱ्यांकडून आगी लावल्या जात असल्या तरी अनेक वेळा यात शिकाऱ्यांचेही फावते. वणव्यांमुळे गवत जळून खाक होते. त्यावर जगणारे तृणभक्षी प्राणी नष्ट होतात. आगीत छोट्या प्राण्यांचाही जीव जातो. सुपिकता वाढविणारा पालापाचोळा नष्ट झाल्याने जंगलाचे नुकसान होते. छोटे प्राणी नष्ट झाल्याने त्यावर जगणारे वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलाबाहेर येऊन मानवी वस्तीलगत हल्ले करतात. यात अनेक वेळा शिकाऱ्यांचेही फावते. असे अनेक प्रकारचे नुकसान होत असताना आगी लावणाºयांवर कडक कारवाई होताना दिसत नाही.