कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:51+5:302021-08-29T04:34:51+5:30

कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहे. ...

Many schools in Korchi taluka are without electricity | कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच

कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच

Next

कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे. काेरची तालुका आधीच अतिदुर्गम व जंगलव्याप्त भागात पसरला आहे. त्यामुळे तालुक्यात वीजसमस्या आहे. गावांसह शाळांमध्ये वीज पाेहाेचविणे आवश्यक आहे.

घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला

गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून लोहा, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरांतही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी पाच लाखांत होणाऱ्या घर बांधकामासाठी आता १२ लाखांहून जास्त खर्च लागत आहे. खर्च वाढल्याने घर बांधणारे अनेकजण कर्जात सापडले आहेत. सर्वसामान्य लाेकांना शासकीय याेजनांच्या माध्यमातून घरकुलचा लाभ देण्यात येताे. परंतु अनुदान वेळेवर मिळत नाही.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्तच

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत. दुर्गम भगाात विजेचा अभाव आहे. त्यामुळे साैरदिवे लावण्यात आले; परंतु अज्ञातांनी साैरदिव्यांची चाेरी केल्याने सध्या खांब उरले आहेत. या ठिकाणी नवीन बॅटऱ्या व दिवे लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही; त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले. तलावाचे साैंदर्यीकरण केल्यास नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध हाेईल. तसेच पर्यटनाला वाव मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील महिला व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.

ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिराची गरज

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून आजवर पाच ते दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. यासाठी शिबिर घेऊन परवाने द्यावेत. ग्रामीण भागात अनेक ट्रॅक्टरचालक आहेत; परंतु त्यांच्याकडे चालक परवाना नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण केल्यास नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही.

Web Title: Many schools in Korchi taluka are without electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.