स्वच्छता स्पर्धेला अनेक शाळांचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:55 PM2017-12-18T23:55:03+5:302017-12-18T23:55:24+5:30
देशभरातील शाळांमध्ये स्वच्छता राखली जावी या उद्देशाने केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय स्पर्धा सुरू केली आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : देशभरातील शाळांमध्ये स्वच्छता राखली जावी या उद्देशाने केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय स्पर्धा सुरू केली आहे. मात्र या स्पर्धेविषयी जिल्ह्यातील शाळांचे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील जवळपास दोन हजार शाळांपैकी केवळ ४१ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली.
केंद्र शासनाने २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. याच धर्तीवर देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांना ३० आॅक्टोबरपर्यंत शेवटची तारीख देण्यात आली होती. आॅनलाईन पध्दतीने मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेमध्ये स्वच्छतेबाबत असलेल्या सोयीसुविधांविषयी माहिती भरायची होती. यामध्ये प्रामुख्याने पाण्याची उपलब्धता, शौचालय व मुतारीची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तवणूक बदल व क्षमता विकास या मुख्य पाच घटकांचा समावेश आहे. या मुख्य पाच घटकांतर्गत ३९ उपघटक निश्चित करण्यात आले होते. सदर उपघटक शाळेमध्ये आहेत काय याची माहिती भरायची होती. गडचिरोली जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या मिळून जवळपास दोन हजार शाळा आहेत. मात्र यापैकी केवळ ४१ शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. उर्वरित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आॅनलाईन अर्जच भरले नाही. प्रत्येक जिल्ह्यातून कमाल ४८ शाळा राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धेसाठी पाठवायच्या होत्या. मात्र तेवढ्याही आकड्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. ज्या ४१ शाळांनी स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये २३ शाळांना केवळ तीन स्टार मिळाले आहेत. १५ शाळांना चार स्टार मिळाले आहेत. तर केवळ दोन शाळांना पाच स्टार मिळाले आहेत. पाच स्टार मिळालेल्या शाळाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतात. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या शाळांमध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शाळा व धानोरा तालुक्यातील कवडीकसा शाळेचा समावेश आहे. ही अत्यंत शोकांतिका असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या मूल्यांकनावरून धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी प्रदान करण्यात आला. या विद्यालयाचे यश जिल्ह्यातील इतर शाळांना स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रेरणायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सदर स्पर्धा ऐच्छिक असल्याने शिक्षण विभागाचे अधिकारीही महत्वपूर्ण असलेल्या या स्पर्धेला किंमत देत नाही.
शाळांमध्ये सुविधा नाही
स्वच्छ विद्यालय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी केवळ पाच घटक आवश्यक आहेत. यामध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालय व मुतारीची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तवणूक बदल व क्षमता विकास या घटकांचा समावेश आहे. या मूलभूत सोयीसुविधा सुध्दा शाळांमध्ये उपलब्ध नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सुविधा नसतील तर त्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र ज्या शाळेत सुविधा आहेत, अशा शाळांना सहभाग आवश्यक करावा.