सौरऊर्जेवरील अनेक याेजना बंद, नळ योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:55+5:302021-01-25T04:36:55+5:30
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युतची सुविधा नाही, तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या ...
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युतची सुविधा नाही, तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या गावांमध्ये सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रा.पं.च्या दुर्लक्षितपणामुळे अनेक योजनांमध्ये बिघाड झाल्याने त्या बंद आहेत.
कोरची तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा
कोरची : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या गावांमधील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.
तालुका औद्योगिक वसाहती रखडल्या
गडचिरोली : औद्योगिक विकासाला वाव देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे चित्र असले तरी नवीन सरकारच्या काळात जिल्ह्यातील तालुका औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मात्र प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आरमोरी मार्गावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या तिन्ही ठिकाणी नव्याने प्रवासी निवारे बांधण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
महामार्गावरील अनधिकृत गतिरोधक हटवा
गडचिरोली : महामार्गावर गतिरोधक बांधायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बहुतांश गावांमध्ये तसेच राज्य महामार्गांवर नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतींनी कोणतीही परवानगी न घेता गतिरोधक बांधले आहे. सदर अवैध गतिरोधक हटविण्यात यावे, अशी मागणी आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाहीत
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडा बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडा बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
अनधिकृत गतिरोधक हटवा
गडचिरोली : महामार्गावर गतिरोधक बांधायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बहुतांश गावांमध्ये तसेच राज्य महामार्गांवर नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतींनी कोणतीही परवानगी न घेता गतिरोधक बांधले आहे. सदर अवैध गतिरोधक हटविण्यात यावे.
लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही
धानाेरा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतानाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाहीत. त्यामुळे नागरिकांना कर्मचाऱ्यांची वाट बघत टेबलाजवळ उभे राहावे लागत आहे. लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
आरोग्य केंद्रात राहणे सक्तीचे करा
भामरागड : प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात निवासस्थाने बांधून देण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश डॉक्टर व परिचारिका निवासस्थानांमध्ये राहत नाहीत.
पशुपालनाच्या योजनांबाबत जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.
शेतजमिनी होत आहेत अकृषक
गडचिराेली : शेतजमिनी अकृषक करून तेथे प्लॉट पाडण्यात येत आहेत. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. चांगल्या जमिनी व्यावसायिकांच्या घशात जात आहेत. काही व्यावसायिक तर जमीन अकृषक न करताच विक्री करीत आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
नदीपात्रातील शेतीवर कारवाई करा
गडचिरोली : नदीपात्रात भाजीपाला पिकांची लागवड करतात. भाजीपाल्यावर विविध कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असल्याने लागवडीवर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
नळाला तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय
देसाईगंज : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.