जंगले नष्ट झाल्याचा परिणाम, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 01:48 PM2021-11-16T13:48:56+5:302021-11-16T14:00:47+5:30
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. पक्ष्यांची शिकार, तलाव आणि नद्या व अतिक्रमण, जनजागृतीचा अभाव, उच्च रक्तदाब वीजवाहिन्या, शेतातील कीटकनाशकाची फवारणी यांमुळे पक्षांची संख्या झपाट्याने घटली आहे.
प्रदीप बोडणे
गडचिरोली : कमी हाेत चालले जंगल व पक्ष्यांच्या वाढलेल्या शिकारी यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पक्ष्यांची संख्या निम्याहून कमी झाली आहे. तसेच काही प्रजाती नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहेत. वनविभागाने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या पिढ्यांना अनेक पक्षी केवळ कागदावरच बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्म दिवसापासून म्हणजेच १२ नाेव्हेंबरपासून पक्षी सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने वनविभागाने पक्षी निरीक्षणे, जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन प्रशासकीय पातळीवर पक्षी सप्ताह साजरा केला; पण पक्ष्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी वन विभागाकडून फारशा उपाययोजना होताना दिसत नाही.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील झाडीच्या जंगलात पक्षी वैभव आहे; पण हे पक्षी वैभव टिकवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. लहान खुरटी, झुडपी जंगलात आणि तलावांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात आणि विशेष म्हणजे तलावात पान वनस्पती अधिक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा संचार राहत होता. मात्र मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. पक्ष्यांची शिकार, तलाव आणि नद्या व अतिक्रमण, जनजागृतीचा अभाव, उच्च रक्तदाब वीजवाहिन्या, शेतातील कीटकनाशकाची फवारणी यांमुळे पक्षांची संख्या झपाट्याने घटली आहे.
वन विभागाने मानवीकृत रोप वनाच्या नावाखाली हजारो हेक्टर क्षेत्रावरील जंगल तोडून त्या ठिकाणी नवीन राेपे लावण्यात आली आहेत. जिल्ह्यातील उरलेसुरले जंगल वनविकास महामंडळाच्या घशात गेले. शासनाने सहकारी संस्थांना कुप देण्याच्या नावाखाली उभे जंगल नष्ट केले आहे. सरकारच्या आणि वन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पक्ष्यांचा अधिवास नाहीसा झाला.
कवडी, हरियल,पान कोंबडी, पोपट, कावळा, घार, चिमणी, कोकिळा, गिधाड, घुबड, खंड्या ,भारद्वाज या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, पण पक्ष्यांच्या निवासावर मानवी अतिक्रमण झाले. सफाई दूत म्हणून ओळखणारा गिधाड हद्दपार झाला. शिवाय कोकिळेचे मधुर स्वरही लोप पावत चालला आहेत.
थंडीची चाहूल लागली आणि शेतातील खरिपाचा हंगाम संपला आणि रब्बीचा हंगाम शेतात बहरू लागला की, पिकांना आलेला बहर टिपण्यासाठी इतर कवडी, हरियल, खंड्या, भारद्वाज, चिमणी, पोपट्या या पक्ष्यांचा संचार वाढत हाेता; पण हिवाळ्यात संचार करणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहेत. निसर्गाचा वैभव आणि मानवी मनाला आनंद देणारे पक्षांचे आवाज. त्यांच्या हालचाली मन प्रसन्न करणारे होते. पण रंगीबिरंगी गोजिरवाण्या पक्ष्यांची मानवाकडून शिकारीचे अघोरी कृत्य होत आहे. ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेऊन पक्ष्यांची संख्या वाढेल यासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे.
पक्षी संवर्धनासाठी या उपाययाेजनांची गरज
पक्ष्यांचा अधिवास कायम ठेवून त्यांच्या खाण्याची व्यवस्था हाेण्यासाठी जंगल कायम असणे आवश्यक आहे. मानवी जीवनात व पर्यावरण संवर्धनात पक्ष्यांचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे लागेल. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. शिकारीवर आळा घालावा, वनाची जैवविविधता टिकवावी, तलावांत कीटकनाशके साेडण्यावर प्रतिबंध घालावा.