अनेक तेंदू कंत्राटदारांचा पैसा खंडणीच्या रुपात नक्षलवाद्यांना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 01:02 PM2020-06-09T13:02:11+5:302020-06-09T13:03:50+5:30
तेलगू कंत्राटदारासोबतच महाराष्ट्रातील काही तेंदू कंत्राटदारांचे नक्षलवाद्यांसोबत आर्थिक संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे तेंदूपत्ता तोडाईचे कंत्राट घेणाऱ्या अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांना खंडणीच्या रूपात पैसा पुरविला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात तेलंगणातील एका कंत्राटदाराकडून नक्षल्यांसाठी जाणारी १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी पकडल्यानंतर याबाबतचे धागेदोरे गवसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२ जून रोजी तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या दोन वाहनांमधील २ कोटी २० लाख रुपयांपैकी एका वाहनातील १ कोटी २० लाख रुपये नक्षलवाद्यांना देण्यासाठी जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राज्याच्या सीमेवर एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून ती रक्कम सिरोंचा पोलिसांनी जप्त केली होती. दरम्यान त्या वाहनातील कंत्राटदाराचा व्यवस्थापक संजय अवथळे (रा.आष्टी) याला पोलिसांनी अटक केली तर तेलंगणाच्या वारंगल येथील दोन तेंदूपत्ता कंत्राटदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ते कंत्राटदार सध्या फरार आहेत. मात्र अटकेत असलेल्या व्यवस्थापकाचा १० दिवसांचा पीसीआर मिळवण्यात पोलिसांना यश आल्यामुळे त्याच्याकडून या व्यवहाराची बरीच माहिती हाती लागणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणातील तेलगू कंत्राटदारासोबतच महाराष्ट्रातील काही तेंदू कंत्राटदारांचेही अशाच पद्धतीने नक्षलवाद्यांसोबत आर्थिक संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा तपास पुढे सरकताना इतर काही कंत्राटदारांची नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तपास अहेरी एसडीपीओंकडे
दरम्यान तेंदूपत्ता ठेकेदार आणि नक्षलवाद्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणाºया या महत्वपूर्ण प्रकरणाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे. अटकेत असलेल्या एका आरोपीकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासोबतच तेलंगणातील फरार कंत्राटदाराला अटक करणे आणि नक्षलवाद्यांच्या कोणत्या दलमकडे पैशाची रसद जाणार होती त्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.