तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:41 AM2021-09-23T04:41:33+5:302021-09-23T04:41:33+5:30
कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील ...
कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतीपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाही
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारी या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. नगरपालिका प्रशासनाने याबाबत अजूनही निर्णय घेतला नाही.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. प्रशासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष हाेत आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने, साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
भेंडाळा बस स्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बस स्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेईस्कर हाेणार आहे.
सुरसुंडीजवळील पूल अडवितो मार्ग
कुरखेडा : कुरखेडा-मुरूमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरूपधोडरी गावादरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होत असतो. सुरसुंडी गावाजवळून भेदरी नदी वाहते. या नदीवर ठेंगणा पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात थोडेअधिक पाणी पडल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक ठप्प होत असते. कुरखेडा-मुरूमगाव मार्गावर सदर नदी आहे. पुलावरून वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. सुरसुंडी, इरूपधोडरीसह इतर गावे प्रभावित होतात.
दुर्गम भागातील सौरदिवे दुरुस्ती नाही
चामोर्शी : वीजपुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली; परंतु या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौरप्लेट लंपास करण्यात आल्या आहेत. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
हेमाडपंती मंदिराचा विकास करा
आमगाव (म.) : तालुक्यापासून १० कि. मी. अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंती मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्त्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथील देवालय ऋषींची मूर्ती, शिवपिंड, नदी, अष्टविनायक, लक्ष्मी नारायण, शिवपार्वती शाईल, हत्ती, घोडे, हनुमान, महाकालीचे देवालय, खोदकामामध्ये सापडलेली नाणी, शिलालेख, टाकीच्या पायऱ्या आहेत.