संततधार पावसाने अनेक गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:25 PM2019-07-29T22:25:50+5:302019-07-29T22:26:05+5:30

मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, भामरागडसह अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.

Many villages are out of touch due to incessant rain | संततधार पावसाने अनेक गावे संपर्काबाहेर

संततधार पावसाने अनेक गावे संपर्काबाहेर

Next
ठळक मुद्देअनेक ठिकाणचा वीज प्रवाह खंडित : शेकडो गावे अंधारात; नदी-नाल्यांच्या पुरामुळे वाहतूक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, भामरागडसह अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.
धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत होता. अशातच शुक्रवारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गेल्या दोन दिवसात धान रोवणीच्या कामांना गती आली आहे. तसेच नदी, नाले ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यातील नदी व नाले जंगलातून वाहतात. जंगलातील पूर्ण पाणी नदी, नाल्यांमध्ये येते. काही नदी व नाल्यांवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून काही ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.
सोमवारी दिवसभर व रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर सुरूच होता. त्यामुळे मंगळवारीही नदी, नाले ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.
आष्टी : आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली नाला आहे. या नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. सोमवारी या नाल्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे जवळपास तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.
कमलापूर : कमलापूर-दामरंचा मार्गावर सोमवारी कमलापूर पासून तीन किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागले.
अंकिसा : गडचिरोली जिल्ह्यासह सिरोंचा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सततच्या पावसामुळे बालमुत्यमपल्लीजवळील येर्रावागू नाला ओसंडून वाहत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वैरागड : पावसामुळे रोवण्याच्या कामांना गती आली आहे. सती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सदर नदी दुथडी भरून वाहत आहे. सखल भागात पाणी साचले आहे.
अहेरीनजीकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पलिकडेच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
भामरागड तालुक्यातील दुरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. भामरागड तालुका तिन्ही बाजुने नद्यांनी वेढला आहे. पूर परिस्थितीत या तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे भ्रमणध्वनी व दुरध्वनी सेवा सुरू असणे आवश्यक असतानाही आवश्यक वेळीच दुरध्वनी सेवा ठप्प पडली आहे.

Web Title: Many villages are out of touch due to incessant rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.