अनेकांचे पांढरे सोने घरातच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:02+5:30
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच बाजार समित्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील कोटापल्ली परिसरात कापसाची लागवड केली जाते. कापूस निघण्याला सुरूवात झाली असतानाच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे कापसाची विक्री ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
कोटापल्ली परिसरातील कोटापल्ली, मोयाबीनपेठा, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मुलादिमा, दरसेवाडा, बोकाटगुड्डम, कोत्तूर, येल्ला, किरमाडा, पारसेवाडा, चिक्याला आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतात. सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड करतात. सिरोंचा येथे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत खरेदी केंद्र असले तरी तेलंगणा राज्यात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळला आहे. जानेवारी महिन्यापासून कापूस निघण्यास सुरूवात होते. एप्रिलपर्यंत जवळपास चारवेळा कापूस काढले जाते. सध्या शेवटची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला सुरूवात केली आहे. त्यामुळे पैशाची गरज आहे.
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच बाजार समित्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ठेवण्याची अडचण
कापूस हा अतिशय संवेदनशील पीक आहे. थोडीही जर आग लागली तरी संपूर्ण कापूस व घर भस्म होण्याची शक्यता राहते. पावसाने कापूस भिजल्यास तो काळा पडून खराब होण्याची भीती राहते. तसेच उन्हामुळे वजन कमी होते. त्यामुळे जास्त दिवस कापूस घरी ठेवल्यास शेतकऱ्यांचा तोटा होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन कधी उठेल, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.