जहाल नक्षली शंकर रावचा मृत्यू; सहकाऱ्यानेच केली हत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:28 AM2022-11-10T10:28:46+5:302022-11-10T10:29:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींना नक्षल चळवळीकडे आकर्षित करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.
गडचिरोली : महाराष्ट्रात नक्षल चळवळ रुजविण्याच्या प्राथमिक काळात अग्रस्थानी असणारा आणि नक्षल्यांची सांस्कृतिक विंग सांभाळणारा जहाल नक्षलवादी शंकर राव ऊर्फ आसम शिवा याचा मृत्यू झाला आहे. २८ ऑक्टोबर रोजीच त्याचा मृत्यू झाल्याचे भाकपा (माओवादी) दंडकारण्य पश्चिम ब्यूरोच्या प्रवक्त्याने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले. शंकर रावच्या स्मृतीप्रीत्यर्थ २२ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्ह्यात शोक पाळणार असल्याचेही त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यात दिलीप ऊर्फ नितेश हिचामी या नक्षल सदस्याची नक्षल्यांकडूनच हत्या करण्यात आली. जहाल नक्षली शंकर राव याची गोळ्या झाडून दिलीप यानेच हत्या करून फितुरी केल्याचा व तो पोलिसांसाठी काम करत असल्याचा नक्षलवाद्यांचा संशय होता. त्यातूनच दिलीपला जिवे मारल्याचे त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले.
गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गर्देवाडा मर्दाकुही गावाजवळ टिपागड दलम सदस्य दिलीप ऊर्फ नितेश हिचामी याची दोन दिवसांपूर्वी गट्टा भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी हात बांधून आणि गळा आवळून हत्या केली. तो २०११ पासून नक्षल चळवळीत सहभागी झाला होता; पण अलीकडे तो फितूर झाला होता आणि पोलिसांना माहिती देत होता, असा संशय नक्षल्यांना होता. दरम्यान नक्षल्यांनी हत्या केलेल्या दिलीप उर्फ नितेश हिचामी याचा पोलिसांशी कोणताही संबंध नव्हता. तो पोलिसांचा खबरी नव्हता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
तेलगू, गोंडी, माडिया या भाषांमधून तो गाणी लिहीत होता. त्यातून पुढे तो त्यांच्या सांस्कृतिक विंगचा प्रमुख झाल्याचे सांगितले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींना नक्षल चळवळीकडे आकर्षित करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.
महाराष्ट्रात नक्षल चळवळ रुजविण्यात महत्त्वाचा वाटा
१९८० च्या दशकात महाराष्ट्रात सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तत्कालीन आंध्र प्रदेशमधून नक्षल चळवळीने प्रवेश केला. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातील आसमटोला येथील शंकर राव ऊर्फ आसम शिवा हा साहित्यिक, कलावंत म्हणून नक्षलवाद्यांशी जुळल्या गेला. नक्षलवाद्यांसाठी तो स्फूर्तिदायक गीतरचना करीत होता.